शेतकऱ्याने केली गांजाची आंतरपीक लागवड, पोलिसही झाले घामाघूम तर शेतकरी …

शेअर करा

अफू शेतीमुळे काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात बुधवारी गांजाची शेती उघडकीस आली. परळी ग्रामीण पोलिसांनी गुट्टेवाडी येथे छापा टाकून एक क्विंटल गांजा जप्त केला, मात्र आंतरपीक स्वरूपात घेतलेल्या या पिकामुळे एक क्विंटल गांजा जप्त करण्यासाठी पोलिसांना सुमारे दीड तास मेहनत करावी लागली आणि पोलिस देखील घामाघूम झाले.

भाऊसाहेब दत्ता गुट्टे याची गुट्टेवाडी शिवारात शेती आहे. शेतात तुरीचे पीक उभे आहे मात्र पैसे जास्त मिळावेत म्हणून त्याने चक्क गांजाचे आंतरपीक घेतले होते. गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना ही माहिती मिळताच बुधवारी दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी कारवाई करत गुट्टे याच्या शेतात छापा टाकला. तलाठी भगवान भताने व त्यांचे दोन सहकारी पंच देखील यावेळी सोबत होते.

दहा अंमलदारांनी तुरीतील गांज्याचे आंतरपीक दीड तासात गोळा केले आणि वाहनातून ते ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले, याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून कारवाई झाली त्यावेळी भाऊसाहेब गुट्टे हा आठवडी बाजाराला गावी गेलेला होता. पोलिसांच्या कारवाईची माहिती होताच तो परस्पर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.


शेअर करा