प्रेयसीला भेटण्यासाठी नगरहून काढली दुचाकी आणि निघाला पाकिस्तानला : मात्र पुढे काय झाले ?

शेअर करा

सोशल मीडियावर त्याची पाकिस्तानच्या एका तरुणीशी मैत्री झाली. सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून तरूणीला भेटण्यासाठी तो आतुर झाला . लॉकडाऊनमुळे वाहने उपलब्ध नसल्याने दुचाकीवरून प्रवास करण्याचे त्याने ठरवले. झिशान मोहम्मद सिद्दीकी असे ह्या प्रियकराचे नाव असून त्याने चक्क दुचाकीवर पाकिस्तान गाठण्याचा प्लॅन केला होता मात्र पाकिस्तानपासून अवघे दीड किलोमीटरचे अंतर राहिलेले असताना त्याला अटक करण्यात आली.

महाराष्ट्रातील उस्मानाबादचा रहिवासी असणारा २० वर्षीय झिशान इंजिनियरींगचा विद्यार्थी आहे. त्याची सोशल मीडियावरून पाकिस्तानच्या कराचीस्थित तरूणीशी ओळख झाली होती. काही कालावधीत त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आहे मग देश काय राज्य काय , काहीही करून तिला भेटायचे अशा निर्धाराने त्याने पाकिस्तान गाठण्याची तयारी केली.

त्याला पाकिस्तानला जाण्यासाठी दुचाकी देखील नव्हती त्यामुळे काहीतरी जुगाड करून तो अहमदनगर पर्यंत आला आणि नगरमधून त्याने बाईक मिळवली आणि प्रवास सुरु केला. नाशिकमार्गे गुजरातपर्यंत तो पोहचला. गुजरातमध्ये गेल्यानंतर त्याने कच्छचे रण गाठले. मात्र पुढे वाळूतून बाईकवर प्रवास शक्य होईना, कारण गाडीचे चाके वाळूत अडकली.

बाईकने पुढे जाणे शक्य होणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने बाईक तिथेच सोडून दिली आणि पायी पाकिस्तानला निघाला. महाराष्ट्रातील नोंदणी असणारी बेवारस दुचाकी गुरूवारी सायंकाळी आढळल्याने गुजरात पोलिसांनी अलर्ट जारी केला. त्यानंतर झिशानला पाकिस्तानात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असताना बीएसएफ जवानांनी ताब्यात घेतले. त्याला रोखण्यात आले ते ठिकाण भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे.

दरम्यान इकडे झिशान घरातून अचानकपणे गायब झाल्याने त्याच्या कुटूंबीयांनी उस्मानाबाद पोलिसांत तक्रार नोंदवली. उस्मानाबाद पोलिसांच्या सायबर शाखेने झिशानचा मोबाईल फोनवरून माग काढला. तो कच्छजवळ असल्याचे स्पष्ट झाल्याने उस्मानाबाद पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला आणि पुढे सूत्रे हलवून झिशानला ताब्यात घेण्यात आले. झिशानने सांगितलेले कारण कितपत खरे आहे ? याची देखील चौकशी होणे अद्याप बाकी आहे .


शेअर करा