खाकी नावालाच , पगार फक्त ‘ इतका ‘ एसटी कर्मचाऱ्यांचे धक्कादायक सत्य

शेअर करा

नगर जिल्ह्यात शेवगाव येथे नुकतीच एका एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची घटना घडली होती, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे हाल किती होत आहेत याबद्दल अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. नगर चौफेरने देखील एसटी कर्मचाऱ्यांचे संसार सद्यपरिस्थितीत अक्षरश: उसनवारीवर चाललेले वृत्त प्रकाशित केले होते.

एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ अकरा हजार रुपये वेतन मिळते आणि इतक्या तुटपुंज्या वेतनामध्ये घर भाडे, मुलांचे शिक्षण आई-वडिलांचे आजारपण असा खर्च कसा निघणार ? असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय कर्मचारी फक्त नावालाच मात्र आर्थिक बाबतीत मात्र इतर कोणतेही फायदे कर्मचाऱ्यांना दिले जात नाहीत म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन द्यावे आणि शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यापाठोपाठ राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढलेल्या आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात तीस एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बहुतांश ठिकाणी आर्थिक अडचण हेच कारण समोर आले आहे. एसटीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केवळ अकरा हजार रुपये वेतन मिळते. त्यात पंधराशे रुपये घरभाडे, भत्ता शंभर रुपये धुलाई भत्ता आणि सत्तर रुपये रात्र भत्ता मिळतो, अशा परिस्थितीत कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा ? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तब्बल निम्मेच वेतन मिळत असल्याने घर चालवायचे कसे ? मिळणारे वेतन देखील वेळेवर मिळत नसल्याने जगायचे कसे ? अशा दुहेरी संकटात हे कर्मचारी सापडले आहेत. दिवाळीत देखील एसटी कर्मचाऱ्यांना केवळ पंचवीस रुपये बोनस देण्याची घोषणा केलेली आहे. इतक्या तुटपुंज्या बोनसवर दिवाळी कशी साजरी करायची ? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करून घ्यावे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने आणखी पावले उचलावी अशी देखील मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.


शेअर करा