एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळणार , कर्मचाऱ्यांचा ‘ मोठा ‘ निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच असून एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. आंदोलनावर कुठलाही तोडगा निघत नाहीये आणि त्यातच महामंडळाकडून राज्यातील विविध विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचं दररोज निलंबन करण्यात येत आहे. महामंडळाकडून सुरु असलेल्या या कारवाईनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून सर्वच कर्मचाऱ्यांचे सामूहिक निलंबन करण्याची मागणी केली आहे.

पत्रात म्हटल्याप्रमाणे, “आम्ही स्वारगेट आगार पुणे येथील सर्व कर्मचारी दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करणेसाठी राज्यातील इतर सर्व आगारातील व इतर प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात सहभागी आहोत.

तरी या संपूर्ण आंदोलनात आम्ही सर्व कामगारांनी एकमताने व सहमताने कामबंद / संप आंदोलन केले आहे. सदर आंदोलनामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांचा तेवढाच व पुर्ण सहभाग व सदर कामबंद संपास आम्हीही तेवढेच जबाबदार असून जर आपल्याकडून निलंबनाची कार्यवाही होत असेल तर ही कार्यवाही आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एकत्रितपणे करण्यात यावी.”

जर निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक दबावामध्ये स्वत:च्या जीवाचे काही बरे वाईट करुन घेतले तर त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असंही एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता चिघळत असल्याचं दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबतच आता त्यांचे कुटुंबीयही संपात सहभागी होऊन रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.