.. आणि म्हणून ‘ त्या ‘ चौघींना अटक, मनोज पाटील म्हणाले की

शेअर करा

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली तेव्हाचे भक्कम पुरावे सीसीटीव्हीमध्ये मिळाले आहेत. त्यामुळेच चार जणांना अटक केली आहे, अशी भूमिका पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली असून ज्या पद्धतीने तपास सुरु आहे त्याची पाठराखण केली आहे .

विभागात आग लागल्यानंतर सुरवातीची १५ मिनिटे रुग्ण वगळता एकही डॉक्‍टर किंवा कर्मचारी या विभागात नव्हता. तब्बल २५ मिनिटांनी या विभागात नियुक्तीला असलेले डॉक्‍टर आणि परिचारिका आल्या. उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांनी आत जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण नंतर कोणीही आत गेले नाही. काही कर्मचारी तर बाहेर चहा घेत होते तसेच ज्या विभागात ज्यांची नियुक्‍ती होती, त्यांनी आपल्या नियुक्‍तीच्या ठिकाणी हजर राहणे आवश्‍यक होते. त्यांनी आपली जबाबदारी टाळली.

सदर व्यक्तींचा हा निष्काळजीपणा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे आणि या भक्कम पुराव्यांमुळेच चौघींना अटक केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने सुरवातीच्या चौकशीत कर्मचाऱ्यांनी इतर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सांगितले. मात्र सर्वांच्या जबाबात विसंगती आढळली, तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळून आले नाही.

अतिदक्षता विभागातील एका किंवा दोघांनी सकारण बाहेर जाण्यास हरकत नाही, पण एकाच वेळी २५ मिनिटे तीन-तीन जण बाहेर जात असतील तर हा निष्काळजीपणाच आहे. नियुक्त डॉक्‍टर व कर्मचारी यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केला आहे. आग लागल्याचे समजताच रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले असते, तर काहींचे प्राण वाचवता आले असते. आग कोणत्या कारणामुळे लागली, त्यामध्ये कोण दोषी आहे, याचाही पोलिस सखोल तपास करीत आहेत, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आणि पोलिस तपास याचा संबंध नाही. पोलिसांची फौजदारी कायद्यानुसार स्वतंत्र कारवाई सुरू आहे. त्यामुळे निलंबित केलेल्या सर्वांना अजून आरोपी केलेले नाही. अटकेत असलेले चौघेच सध्या आरोपी आहेत. शल्यचिकित्सकांचा अद्याप आरोपी म्हणून समावेश नाही. जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडात पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत या चौघींना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात देखील कर्मचारी नसणे आणि असतील तर ते पेशंटपासून बऱ्याच अंतरावर असणे असे प्रकार कोरोनाच्या काळात देखील उघडकीस आले होते मात्र कामाचा लोड असल्याचे कारण पुढे करत त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदारपणाकडे वरिष्ठांकडून देखील दुर्लक्ष होत होते. कोरोना कमी झाला मात्र कर्मचारी अद्याप देखील आपल्याला कोणी काही विचारू शकत नाही, या मानसिकतेतून बाहेर आलेले नसल्याने त्यांचे दुर्लक्ष झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली.


शेअर करा