औरंगाबाद हादरले..एकाच दिवशी तरुण-तरुणीची आत्महत्या, गावचा उपसरपंच ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. गंगापूर तालुक्यातील मालुंजा (खु) गावात एकाच दिवशी तरुण-तरुणीनं गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संबंधित दोन्ही आत्महत्या करण्याच्या अंतरात अवघ्या काही तासाचा फरक असल्याने पोलीस चहुबाजूने तपास करत आहेत. पोलिसांनी मुलंजा गावच्या उपसरपंचाला ताब्यात घेतलं असून गंगापूर पोलीस तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, उमेश शांताराम साळुंखे (वय 27) आणि तबसुम मुजीब शेख (वय 18) असं आत्महत्या करणाऱ्या तरुण-तरुणीचं नाव आहे. मृत उमेश याचे वडील शांतारामा साळुंखे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात मालुंजा गावचे उपसरपंच बंडू ऊर्फ कृष्णा रावसाहेब पवार (वय 32) आणि कोमल ढवळे (वय 26) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, संबंधित दोघांकडे मृत उमेशचा अश्लील व्हिडीओ होता आणि तो व्हायरल न करण्याच्या बदल्यात ते उमेशकडून पैशाची मागणी करत होते त्यामुळे उमेशने आत्महत्या केली.

मृत उमेश हा शनिवारी रात्री उशिरा गावाजवळील तुपे वस्तीवरील आपल्या शेतात झोपण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी शेतातील कांद्याच्या चाळीतील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत उमेशचा मृतदेह आढळला .उमेशच्या आत्महत्येची बातमी गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली अन त्यानंतर अवघ्या दोन तासांत मालुंजा गावातील 18 वर्षीय तरुणी तबसुम हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दोन आत्महत्येचा एकमेकांशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आला नाही मात्र गावात खळबळ उडाली असून गंगापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


शेअर करा