‘ ते म्हणत असतील उपमुख्यमंत्री झाला तर आता सेल्फी काढू देईना ‘, अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या मिश्कील भाषाशैलीसाठी जनतेला चांगलेच परिचयाचे आहेत, याचाच प्रत्यय बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिकांना आला. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘ मी काल कर्जत-जामखेडला गेलो होतो. तिकडे कोणीही मास्क वापरत नाही. मी रोहितला म्हटले अरे शहाण्या तू तर आमदार आहे तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल, ‘ अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर नागरिकांनी लगेच मास्क तोंडावर ओढले.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘ मी भाषण करतानाही मास्क काढत नाही आणि काही जण मास्क वापरतच नाही हे बरोबर नाही. कोरोना कमी झाला असला तरी दक्षता घेण्याची गरज आहे. काहीजण दादा सेल्फी, दादा फोटो म्हणत मागे लागतात, त्यांना नाही म्हणावे तर उपमुख्यमंत्री झाला तर आता सेल्फी काढू देईना. याची बटणे दाबून दाबून आम्ही मेलो इतके दिवस असे म्हणत असतील म्हणून आपले गप्प बसायचे आणि पहाटे जेवढे काही कामे उरकता येईल तेवढे उरकून द्यायचा प्रयत्न करायचा. सकाळी लवकर कामाला सुरुवात केली तर कामे लवकर होतात ‘

‘ कुठेही तुटेपर्यंत ताणायचं नसते. ते सुद्धा समाधानी झाले पाहिजेत आणि प्रवासी सुद्धा समाधानी झाले पाहिजेत तसेच सरकार म्हणून आम्हालाही निर्णय घेता आला पाहिजे, ‘ असे एसटी संपासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले.