देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना बिहार राज्यातील पाटणा इथे उघडकीस आली आहे. एका इसमाने आपल्या मेव्हणीवर असलेल्या प्रेमासाठी बायकोची सासुरवाडीला जाऊन अत्यंत अमानुषपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह चक्क एका बॉक्समध्ये ठेवला व त्यानंतर मेहुणीसोबत पलायन केले. एखादा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत इतकं निर्घृणपणे कसं वागू शकतो? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पाटणा जवळ असलेल्या मोकामा पोलीस ठाणे हद्दीतील अनुमंडल परिसरात ही घटना घडली असून पतीचं नाव सन्नी पासवान असे असून त्याच्या बायकोचे नाव वर्षा कुमारी असल्याचे समजते. सन्नी आणि वर्षा यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं देखील आहेत पण तरीही मेहुणी आणि त्याच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि तो स्वतःचा संसार विसरून गेला. आरोपीने आपल्या मुलांचा विचार देखील केला नाही.
आपल्या शेजारी आलेला पाहुणा मेहुणीसोबत फरार झालेला पाहून शेजारी राहणाऱ्यांना याची कल्पना आली आणि त्यांनी तातडीने वर्षाच्या कुटुंबियांना जे त्यावेळी बाहेर होते त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वर्षाचा भाऊ रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना घेऊन घरी दाखल झाला तेव्हा घरात वर्षाचा मृतदेह एका बॉक्समध्ये सापडला तर तिचा पती आणि बहीण हे घटनास्थळावरुन फरार झाले होते. आपल्या बहिणीचा मृतदेह पाहून भावाने जोरदार टाहो फोडला.
मयत वर्षाच्या मानेवर काही खुणा आढळल्या असल्याने तिचा खून गळा आवळून किंवा गळफास देऊन केला असल्याचा अंदाज आहे. मयत महिला व नवरा यांच्यात भांडणे होत होती म्हणून ही महिला आपल्या माहेरीच राहत होती . सनी याला त्याचा सासरा आणि मेहुणा हे बाहेर जाणार असल्याचा अंदाज होता म्हणून तो सासुरवाडीला पोहचला आणि मेहुणीच्या मदतीने पत्नीची हत्या करून फरार झाला. सोमवारी 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे .