…म्हणून नगर महापालिका ठेकेदारांमध्ये ठरलीय ‘ नकुशी ‘

शेअर करा

नगर महापालिकेचा भोंगळ आणि भ्रष्ट कारभार आता लपून राहिलेला नाही. ठेकेदारांचे पैसे वेळेवर न देणे तसेच पैसे देण्यासाठी महापालिकेत चालणारी कथित टक्केवारी ही या मागची मुख्य कारणे असून आता शहरातील विक्रेत्यांकडून रस्ता बाजू शुल्क वसूल करण्यासाठी संबधित ठेकेदाराने हात वर केले आहेत.आधी एका संस्थेने 46 लाखांची निविदा भरली होती मात्र आता संबंधित संस्थेने वसुली करण्यास नकार दिला असून महापालिकेला तसे कळवले देखील आहे.

नगर शहरासह उपनगरात रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणाऱ्यांकडून रस्ता बाजू शुल्क वसूल केले जाते, हे शुल्क वसूल करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करत हे काम त्रयस्थ संस्थांना दिले जाते. सध्या प्रति दिन 3500 इतका कर वसूल होतो. महापालिकेने रस्ता बाजू करवसुलीसाठी निविदा मागवल्या होत्या मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नांदेड येथील एकमेव संस्था छत्रपती संभाजी राजे सामाजिक संस्थेची निविदा महापालिकेला प्राप्त झाली आणि महापालिकेच्या स्थायी समितीने देखील या निविदेला मंजुरी दिली मात्र त्यानंतर नांदेड येथील संस्थेने रस्ता बाजू कर वसुली करण्यास नकार दिला आहे यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

महापालिकेची कामे करण्यास ठेकेदार देखील फारसे उत्सुक का नाहीत ? यामागील कारणे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. ठेकेदारांची थकलेली बिले वेळेवर मिळत नाहीत आणि मिळाली तर त्यासाठी टक्केवारी द्यावी लागते हे आता लपून राहिलेले नाही . अशाच प्रकरणात महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने 1 महिन्यापूर्वी रंगेहात पकडले देखील होते मात्र त्यानंतर देखील ठेकेदारांचा विश्वास प्राप्त करण्यास महापालिका अपयशी ठरलेली आहे.

ठेकेदारांनी हात वर केल्यामुळे महापालिकेचे अशा मार्गानी येणारे उत्पन्न देखील कमी होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या सोयीसुविधांवर होत आहे. शहरात रस्त्यावर बसणारे असे किती व्यावसायिक आहेत याचीदेखील महापालिकेकडे माहिती उपलब्ध नसल्याने महापालिका कर्मचारी कधी माहिती जमा करणार आणि कधी रस्ता बाजू शुल्क महापालिकेच्या हातात येणार ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापालिका आयुक्त देखील अशा लाचखोरीस आळा घालण्यात कमी पडत आहेत तर दुसरीकडे मुजोर झालेला कर्मचारी व अधिकारीवर्ग आयुक्तांची देखील दिशाभूल करण्यात पटाईत झालेला असल्याने नागरिकांच्या अडचणी देखील वाढत आहेत.


शेअर करा