पुणे हादरले..बहिणीचा मृतदेह तरंगताना दिसताच भाऊ घरी आला अन…

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर भावाने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आणि त्यानंतर स्वतः देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यात त्याचाही मृत्यू झाला. १८ नोव्हेंबरला हा धक्कादायक प्रकार घडला होता.

उपलब्ध माहितीनुसार, मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि. १७) समीर भिवाजी तावरे (वय ३५) यांची बहिण माया सोपान सातव (वय ३२) या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा कुटुंबीय शोध घेत असतानाच गुरुवारी सकाळी माया यांचा मृतदेह विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर हा धक्का बसलेल्या समीर याने घरी येऊन पत्नी वैशाली तावरे (वय २८) हिच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले त्यात पत्नीचा मृत्यू झाला. घरगुती भांडण होत असल्याने हा प्रकार झाला असल्याचा अंदाज आहे.

पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच समीर याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. समीर याला तातडीने दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा तसेच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तर ताज्या वृत्तानुसार समीर याचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ..