राधाकृष्ण विखे पाटलांकडून महाविकास आघाडीचा ‘ पंचनामा ‘, दिले खुले आव्हान

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सत्तेवर आल्यानंतर समान वसुलीचा कार्यक्रम सुरू झाला असल्याचा आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘ समाजातील कोणताही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील रस्त्यावर उतरावे लागले. आरोग्य भरती घोटाळा झाला. एसटी कामगार सुद्धा आझाद मैदानात बसले. शेतकरी वीज वितरण कंपनीच्या दारात दिसत आहे. चक्क कृषी मंत्री पिक विमा कंपन्यांनी चार हजार कोटी रुपयांचा नफा मिळविण्याची कबुली देत असतील तर हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ भ्रष्ट आणि सर्वच समाजघटकांची फसवणूक करणारा ठरला आहे. जनादेश डावलून सत्तेवर आलेल्या सरकारचा समान कार्यक्रम हा फक्त वसुलीचा होता हे आता लपून राहिलेले नाही.

महाविकास आघाडी सरकारने सुद्धा कृषी कायदे मागे घेण्याची केलेली तयारी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक असल्याने याबद्दल माफी मागावी. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हे कायदे बनवले होते. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी समिती गठीत करून शेतकऱ्यांना शेतकरी संघटनांना पर्याय सुचविण्यास सांगितले होते मात्र वर्षभर आंदोलक संघटना पर्याय देऊ शकले नाहीत, या विधेयकांना विरोध करणाऱ्यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना मॉडेल ॲक्टच्या माध्यमातून सुधारणा आणल्या होत्या.

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचे सांगणाऱ्यानी शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. कवडीमोल मदत खात्यात वर्ग केली मात्र लगेच या वसुली सरकारने वीज बिलाच्या नोटिसा शेतकऱ्यांना पाठवल्या. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मिरवणारे आता बांधावर जाऊन शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेचे काय झाले ? राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही खरच मदत केली असेल तर त्याची श्वेतपत्रिका काढा, असे आव्हान देखील विखे पाटलांनी सरकारला दिले आहे