नगर जिल्ह्यातील आंदोलनांचा प्रशासनाने घेतला धसका , ‘ ह्या ‘ ठिकाणी कलम १४४ लागू

महाराष्ट्रात सध्या या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने सुरू असून नगर जिल्हा देखील याला अपवाद नाही. जिल्ह्यामध्ये राजकीय पक्षांकडून विविध कारणांसाठी आंदोलने करण्यात येत आहेत, त्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने तिथेदेखील पोलीस कर्मचारी बंदोबस्त आहे.

राजकीय पक्षांच्या आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महसूल स्थळ हद्दीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्या हद्दीमध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास म्हणजे जमावबंदी कलम 144 अंतर्गत मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा आदेश सोमवारी जारी केला आहे.

आदेशात म्हटले आहे की, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी 21 तारखेला दिलेल्या पत्रान्वये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या वतीने रस्ता रोको, मोर्चा, धरणे आणि अन्य प्रकारची आंदोलने सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही आंदोलने होत असल्याने तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एसटी महामंडळाच्या विविध संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण राज्य शासनामध्ये व्हावे तसेच कर्जमाफी, कामगार करार इत्यादी मागण्यांसाठी बंद पुकारलेला आहे. जिल्ह्यात 11 ठिकाणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरू आहेत त्यामुळे या आंदोलनात गर्दी होऊन भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे कलम लागू केले गेले आहे.