नगर ब्रेकिंग..बायोडिझेल प्रकरणातील सूत्रधार दिलीप सातपुतेची शिवसेनेतून उचलबांगडी

नगर जिल्ह्यात गाजलेल्या अवैधरित्या बायोडिझेल प्रकरणात डिझेल तस्कर यांनी शासनाला आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुना लावलेला आहे तर दुसरीकडे याच गुन्ह्यातील शिवसेनेचा शहर प्रमुख दिलीप सातपुते याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. सातपुते याच्या या गुन्ह्यामध्ये आणखी काही बड्या नेत्यांचा देखील सहभाग आहे, अशी चर्चा नगर शहरात आहे.

अद्यापपर्यंत दिलीप सातपुते हा पोलिसांच्या हाती आलेला नाही मात्र तो हाती आल्यानंतर देखील पोलीस या बड्या नेत्यांना पर्यंत पोहोचणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केडगाव येथील भरत निवृत्त कांडेकर हा सातपुते याचे बायोडिझेल रॅकेट चालवत होता. त्याला अटक झाल्यानंतर सातपुते लगेच फरार झाला तो अद्यापही पोलिसांच्या हाती आलेला नाही.

बायोडिझेल प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने शिवसेनेचा शहर प्रमुख दिलीप सातपुते याची शहर प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे . शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सातपुते याच्या पदाला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेले आहे असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे सदर रिक्त झालेल्या पदासाठी नवीन शहर प्रमुख म्हणून कोणाची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे प्रकरण ?

अवैध बायोडिझेल तस्करीसाठी केडगावच्या टोळीने कंपनीची स्थापना केली आणि आणि कंपनीच्या माध्यमातून मुंबई व इतर परिसरातून बायोडिझेल खरेदी केले. बायोडिझेल विक्री करण्यासाठी या मुंबई लगतच्या कंपन्यांना परवानगी आहे मात्र हे बायोडिझेल वाहनांना देण्यास मात्र मनाई आहे. सदर टोळीने याचाच फायदा घेत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या आणि मुंबईसह इतर परिसरातून हे बायोडिझेल केडगाव परिसरात आणले आणि प्रत्यक्षात मात्र त्याची वाहनांसाठी विक्री केली . तब्बल वीस ते पंचवीस रुपयांनी स्वस्त असे बायोडिझेल मिळत असल्याने विशेषतः बाहेरचे वाहनचालक देखील याचा फायदा घेत होते मात्र यातून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आणि हे प्रकरण उघडकीस आले.