पुणे हादरले..चक्क आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यावर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला परिचारिकेचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण असं या आरोपी सुरक्षारक्षकाचं नाव आहे. तक्रारदार महिला गेस्ट हाऊसमधील बाथरुममध्ये दुपारी आंघोळ करत असताना आरोपी सुरक्षारक्षक अशोक चव्हाण खिडकीबाहेर उभा राहून फोटो आणि व्हिडीओ काढत होता. सदर प्रकार हा या महिलेच्या लक्षात आला अन तिने आरडाओरड सुरु केली. तिथे उपस्थित लोकांनी अशोक चव्हाणला पकडलं आणि नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

बाथरुमच्या खिडकीतून हे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले होते. महिलेने याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . असाच प्रकार आरोपीने अन्य कुणासोबत केला आहे का ? याचा देखील तपास पोलीस करत आहेत.