राधाकृष्ण विखे पाटलांची कार्यकर्त्यांना कडक वॉर्निंग, अन्यथा पक्षात थारा नाही

श्रीरामपूर तालुक्यातील आगामी काळातील नगरपालिका, अशोक कारखाना, बाजार समिती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या झेंड्याखाली लढवल्या जातील. निवडणुकांसाठी ग्रामीण भागात व शहरात दहा जणांची सुकाणू समिती गठीत करून उमेदवारी वाटप केले जाईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे सोबतच सौदेबाजी व अनेक ठिकाणी घरोबा करणाऱ्यांना पक्षात कोणताही थारा मिळणार नाही, असा इशारा देखील आमदार राधाकृष्ण विखे यांनी कार्यकर्त्याना दिला आहे.

राधाकृष्ण विखे म्हणाले की, आगामी काळातील सर्व निवडणुका या भाजपच्या झेंड्या खाली लढवल्या जाणार आहेत. त्यात कोणताही वेगळा प्रयोग होणार नाही आणि पालिका निवडणुकीत आम्ही सौदेबाजीचा धंदा होऊ देणार नाही. कोणतीही स्पष्ट भूमिका न घेणाऱ्या कार्यकर्त्यांना गृहीत धरले जाणार नाही. दहा जणांच्या सुकानु समितीकडून जनतेमध्ये जाऊन चाचपणी करण्यात येईल आणि त्यानंतर उमेदवारीवर निर्णय होईल, त्यामुळे कोणताही पदाधिकारी व कार्यकर्ता उमेदवारी वाटपाची भाषा करत असेल तर त्याला काही अर्थ नाही.

सुकाणू समितीच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून राहील. शहरातील सर्व बूथ प्रमुखांच्या सूचना देखील विचारात घेतल्या जातील.प्रभाग रचना लक्षात घेऊनच उमेदवारांची निवड होईल. त्यामध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय राखला जाईल त्यामुळे सर्वांनी मनापासून एकत्र यावे आणि पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मतभेद दूर करावेत, असेही ते पुढे म्हणाले