पुणे हादरले..बापाच्या कथित प्रेयसीचा बहीण भावाकडून ‘ धक्कादायक ‘ शेवट मात्र…

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात देखील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. अशातच बारामती इथे वडिलांबरोबर संबंध ठेवणाऱ्या एका महिलेचा सदर व्यक्तीच्या मुलाने व मुलीनेच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे . धक्कादायक बाब म्हणजे सदर महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे भासवून भर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

उपलब्ध माहितीनुसार , बारामती कसबा परिसरामध्ये 11 नोव्हेंबर रोजी रात्री स्वाती विनय आगवणे (वय ५० ) यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले मात्र ही घटना म्हणजे हार्टअटॅक नसून घातपात असावा अशी चर्चा परिसरात सुरु झाली आणि बारामती शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. सदर घटनेबाबत आरोपींच्या भीतीने कुणीही उघडपणे तक्रार देत नसल्याने त्यामुळे संशयित व्यक्तीकडे चौकशी करणे जिकरीचे झाले होते. त्यानंतर पोलिसांनी केवळ चौकशीसाठी म्हणून व्यक्तींना बोलावणे सुरु केले आणि एक एक माहिती समोर येत गेली.

मयत स्वाती विनय आगवणे (वय 50) यांचे कसबा भागातमध्ये राहणारे प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे (वय 63) यांच्यासोबत 10 वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. प्रमोद हे कसबामध्ये त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे (वय 34) व मुलगी अनुजा (वय 33 ) सुन व पत्नी यांच्यासोबत राहत होते तर प्रमोद फडतरे यांचा कसबा भागामध्ये फडतरे वाडा म्हणून दुसरे जुने घर आहे. त्या घरामध्ये मयत स्वाती व प्रमोद फडतरे हे अधून मधून एकमेकांना भेटत होते आणि अर्थातच या प्रकाराबद्दल त्यांना घरातून देखील तीव्र विरोध होत होता. प्रमोद यांना वारंवार सांगून देखील त्यांच्या वर्तनात बदल होत नव्हता.

१० नोव्हेंबरला प्रमोद यांनी त्यांचा वाढदिवस घरी साजरा केला आणि त्यानंतर सदर महिलेसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी ते वाड्यावर गेले आणि त्यांनी तिथे या महिलेला बोलावून घेतले. आपले वडील आणि ती महिला वाड्यावर आहेत याची कुणकुण लागताच मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे व मुलगी अनुजा तिथे आले आणि त्यांनी रागाच्या भरात स्वाती आणि वडील प्रमोदला काठीने बेदम मारहाण केली.

स्वाती हिला काठीचा बेदम मार लागल्याने ती निपचित पडली तर प्रमोद किरकोळ जखमी झाले. प्रमोद फडतरे व आरोपी ऋषिकेश व त्याची बहीण यांनी लगेच सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले परंतु रात्रीची वेळ असल्याने वाहन उपलब्ध झाले नाही . त्यानंतर त्यांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर यांना घटनास्थळी बोलावले मात्र तोवर स्वाती यांचा मृत्यू झाला होता. बाहेरून कोणतीच जखम दिसत नसल्याने त्यांनी डॉक्टर यांना स्वाती हिला ह्रदयविकाराचा झटका आल्याचा बनाव त्यांनी रचला.

आपली मुले आता जेलमध्ये जातील या भीतीने प्रमोद यांनी मुलांना साथ दिली आणि चक्क रात्रीतूनच मयत स्वाती हिच्यावर अंत्यसंस्कार उरकण्यात आले. मयत महिलेच्या नातेवाईकांना देखील याबद्दल कोणताच संशय आला नाही मात्र परिसरातील चर्चा पोलिसांच्या कानी आली आणि पोलिसांनी जेव्हा डॉक्टराची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. डॉक्टरांच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी ऋषिकेश फडतरे व त्याची बहीण यांना ताब्यात घेतले असताना त्यांनी खुनाची कबुली दिली आहे .सदर प्रकरणामध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल या अटीवर त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे असे पोलिसांनी आव्हान केले आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख , अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. सदर आरोपींना आज न्यायाधीश जाधव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी मिळाली. सरकारी वकील म्हणून सोनवणे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे ,पोलीस नाईक कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक संजय जाधव व संपूर्ण डीबी पथक करत आहे.


शेअर करा