नाकर्तेपणाचा कुणाचा ? नगर महापालिका कि महावितरण.. अखेर नको ‘ ते ‘ घडलंच

नगर शहरात एक धक्कादायक घटना घडलेली असून विद्युत तारांना खेटून उभारलेल्या लोखंडी कमानीवर मित्राच्या वाढदिवसाचा फलक लावणयासाठी गेलेल्या एका तरुणाचा विद्युत झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. सदर प्रकरणी महापालिका आणि महावितरण यांच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी सुरू झालेली आहे. भर चौकात अक्षरश: विद्युत तारांना खेटून ही कमान उभी करण्यास परवानगी कुणी दिली ? दिलेल्या परवानगी प्रमाणेच नियमाने ही कमान उभारण्यात आली आहे का ? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ सुरेश चौरे ( वय 22 राहणार नालेगाव अहमदनगर ) हा युवक गुरुवारी पहाटेच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाचा फलक लावण्यासाठी प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या लोखंडी कमानीवर चढला होता. कमानी पासून अक्षरश: एक ते दीड फूट अंतरावर असलेल्या विद्युत तारांना त्याचा स्पर्श झाला आणि तो झटका बसून खाली पडला त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीं व्यक्तीने सांगितले.

कमानीचे लोखंडी अँगल आणि विद्युत तारा यांच्यामधील अंतर अत्यंत कमी असून भविष्यात जोराच्या वाऱ्याने देखील या कमानीत विद्युत प्रवाह येण्याची आणि नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. धोकादायक पद्धतीने उभारलेल्या या कमानीला महापालिका अधिकाऱ्यांनी परवानगीच कशी दिली आणि जर दिली असेल तर त्या नियमांना बांधूनच ही कमान उभारली गेली आहे का ? याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे.

महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी खाजगी ठेकेदाराला कमानी उभारून त्यावर दिशादर्शक फलक लावणे तसेच दोन्ही बाजूंनी जाहिरात करण्यास परवानगी दिलेली आहे. शहरातील अनेक भागात अशा पद्धतीने कमानी उभारण्यात आल्या आहेत मात्र प्रोफेसर कॉलनी चौकात विद्युत तारा ह्या कमानीच्या अगदी जवळ आहेत. कमान उभारण्यापूर्वी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती मात्र नेहमीच्या धोरणाप्रमाणे कोणत्याच तक्रारीची महापालिकेकडून दखल घेतली गेली नाही तर महावितरणने देखील सदर प्रकरणात लक्ष घातले नाही, याआधी देखील दोन मजुरांना विजेचा झटका बसून ते खाली पडले होते मात्र तरीदेखील महापालिका आणि महावितरण यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने हा दुर्दैवी प्रकार पुन्हा घडला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नगरकर करत आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांकडून कमानी उभारण्या प्रकरणी सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित ठेकेदार आणि महावितरण यांची आहे. या मार्गावर भूमिगत विजेच्या तारा टाकण्यास परवानगी देण्यात आलेली आहे मात्र महावितरणने हे काम सुरू केले नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे तर महावितरणकडून मात्र विजेच्या तारा पूर्वीपासून आहेत त्यामुळे विजेच्या तारांशेजारी कमान उभारताना महापालिकेने खबरदारी घेणे गरजेचे होते, असे सांगत महापालिकेवर जबाबदारी लुटून दिली आहे.