अखेर ‘ त्या ‘ प्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत, अशातच वीजप्रश्नी आंदोलन करताना महावितरण कार्यालयात चक्क गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक प्रताप दहिफळे यांनी नेवासा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, मंगळवारी संध्याकाळी २३ तारखेला पाच वाजता पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आणि आम्ही कर्मचारी महावितरण कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलन स्थळी गेलो असताना बाळासाहेब मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे तसेच पंधरा ते वीस कार्यकर्ते कृषी पंपांची वीज तोड करू नये, यासाठी आंदोलन करत होते. त्यांनी आंदोलनाचे निवेदन किंवा माहिती पोलिस ठाण्याला कळवली नव्हती. यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुरणा यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली.

चर्चेतून मार्ग निघत नाही, हे लक्षात आल्यानंतर मुरकुटे यांनी कार्यालयाच्या छताला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यातील फास काढला. तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्यासाठी व जनावरांसाठी एक तास वीज सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन कर्ते आंदोलन संपवून ठिकाणावरुन निघून गेले.


शेअर करा