अखेर निर्णय..कोरोना मयताच्या नातेवाईकांना ‘ अशी ‘ मिळणार ५० हजारांची आर्थिक मदत

शेअर करा

महाराष्ट्रात कोरोना काळात राज्यातील तब्बल एक लाख 41 हजार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण सात हजार पन्नास कोटींची मदत देण्याबाबत राज्य सरकारने नवीन आदेश काढले असून पुढील आठवड्यापासून मृतांच्या नातेवाईकांना सेतू केंद्र अथवा महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीतून अर्ज करण्यात करता येणार आहेत.

कोरोना झाल्यानंतर 30 दिवसात मृत्यू झालेल्यांना ही मदत दिली जाणार असून त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राचे बंधन घालण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून कोरोना मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे, त्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली होती. कोरोना झाल्यापासून 30 दिवसात संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्रावर त्यासंबंधीची नोंद असणे बंधनकारक आहे. त्या रुग्णांची कोरोनासंबंधीची चाचणी होणे देखील गरजेचे आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर देखील मृत्यू प्रमाणपत्रावर जर कोरोनाच्या मृत्यू झाल्याची नोंद नसेल तर त्या रुग्णाचे नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे स्वतंत्रपणे अर्ज करू शकतील तसेच जिल्हा व महापालिका स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने विकसित केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळाच्या माध्यमातून मदती संबंधीचे अर्ज करता येणार आहेत, त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून येत्या काही दिवसात त्याचे काम पूर्ण होणार आहे त्यामुळे पुढील आठवड्यापासून नातेवाईकांना अर्ज करता येणार आहेत. अर्जाची छाननी करून त्यानंतर सात दिवसाच्या आत ही मदत संबंधित नातेवाईकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे असे समजते.


शेअर करा