नगरमध्ये शाळकरी मुलांच्या जीविताशी ‘ असा ‘ चाललाय खेळ, महापालिका सुस्तावलेली

नगर शहरासह परिसरातील सर्व शाळा कोरोना काळात बंद होत्या त्यामुळे प्रशासकीय पातळीवर काही ठिकाणी रस्त्यांची कामे देखील सुरू करण्यात आली . काही रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत तर काही ठिकाणी अद्यापही काम सुरू आहे त्यामुळे नगर शहरात रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते आहे. महापालिकेकडून रस्ते बुजवण्याचे जुजबी काम मध्यंतरी करण्यात आले मात्र पुन्हा रस्त्यांची परिस्थिती भयावह झालेली पाहायला मिळते आहे.

शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग महाल रोडपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले आहे . सदर काम जरी झाले असले तरी समर्थ विद्यामंदिर प्रशाला इथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. रस्त्याचे रुंदीकरण झालेले असल्याने तसेच रस्ता देखील चांगला झालेला असल्याने या भागात वेगाने वाहने चालविण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे.

शहरात जिथे जिथे रस्ते चांगले झाले आहेत तिथे शाळांच्या जवळ गतिरोधक तसेच शाळा असल्याचे फलक बसवण्याकडे मात्र ठेकेदार अथवा महापालिका यांच्याकडून दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे शाळांच्या जवळील गर्दी आणि वेगाने जाणारी वाहने यांचा विचार करताना भविष्यात अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

नगर शहरासह परिसरात बहुतांश शाळांच्या जवळपास गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत तसेच काही ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यासाठी देखील गतिरोधक उखडून टाकण्यात आलेले आहेत. शाळांच्या जवळ तरी कमीतकमी लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत आणि मुलांच्या जीविताशी खेळू नये, अशी मागणी आता नगरकर आता करत आहेत. एखाद्याचा बळी गेल्यावरच महापालिकेला जाग येणार का ? असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे.

प्रोफेसर कॉलनी इथे अवघ्या तीन दिवसांपूर्वी दिशादर्शक कमानीजवळ विद्युत वाहिनीला शॉक बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी महापालिका अधिकारी नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी झटकत महावितरणकडे बोट दाखवत आहेत तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या आधीच हात वर केले आहेत. एखाद्याचा बळी गेल्यावर अधिकाऱ्यांचे वर्तन टोलवाटोलवीचे पाहायला मिळते आहे . भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून शाळा जवळ गतिरोधक बसविण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली असून महापालिकेने पुढाकार घेत शाळांच्या जवळ लवकरात लवकर गतिरोधक व शाळा असल्याचे फलक बसवावेत, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.