नगर हादरले ..’ तुमच्या मुलीला भूत लागलंय ‘ सांगून घरी बोलवले अन

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर शहरात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या अंगात भूत असल्याचे सांगत हे भूत बाहेर काढण्यासाठी महिला मांत्रिकासह दोन जणांनी मुलीच्या कुटुंबीयांकडून तब्बल आठ हजार रुपये लाटले आणि हे पैसे परत मागितले असता तीन जणांनी या कुटुंबीयांना मारहाण देखील केली. शहरातील वैदुवाडी येथे 18 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.

उपलब्ध माहितीनुसार, पंधरा वर्षे पीडित मुलीने झालेल्या प्रकाराबद्दल 7 डिसेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात मारहाण तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैदूवाडी येथील एक मुलगी वारंवार फाशी घेण्याचा प्रयत्न करत होती म्हणून तिच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने तिची आई तिला आरती धनगर हिच्या घरी घेऊन गेली त्यावेळी आरती हिने ‘ तुमच्या मुलीला भूत लागले आहे ‘ असे सांगून त्यांना दुसऱ्या दिवशी उपचारासाठी बोलावले.

सदर मुलीला तिन्ही आरोपींनी होम तयार करून त्याच्या समोर बसवले त्यावेळी तिथे एक कोंबडा देखील कापण्यात आला तसेच तुमच्या मुलीच्या अंगात फाशी घेऊन मेलेल्या एका मुलीचे भूत आहे ते आता राहिलेले नाही. आम्ही जादूटोणा करून ते भूत पळून लावलेले आहे, असे सांगत मुलीच्या परिवाराकडून आठ हजार रुपये घेतले. अंधश्रद्धा असल्याचे भासवत फसवून पैसे घेतल्याने ते पैसे मागितले तेव्हा आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी अविनाश व आरती धनगर यांना अटक केली केली होती.

सूत्राच्या माहितीनुसार, वैदूवाडी परिसरात एका मुलीने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या या आत्महत्येच्या घटनेनंतर परिसरातील एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला तर परिसरातील एका अल्पवयीन मुलीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे या सर्व प्रकारामागे त्या मयत मुलीचे भूतच आहे अशी अफवा परिसरात पसरली. परिसरातील नागरिकांचा अशा प्रकारावर विश्वास झटकन बसला आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या मुलीमध्ये तिचेच भूत शिरले आहे या अंधश्रद्धेतून पुढील प्रकार घडला.


शेअर करा