कोरोना योद्धा महिला पॉजिटीव्ह निघताच यंत्रणेचे हात वर ..उघड्या टेम्पोतून केला प्रवास : कुठे घडली घटना ?

शेअर करा

एकीकडे कोरोना योद्धा म्हणून गौरव केला जात असताना दुसरीकडे मात्र या योद्धयांवर देखील जेव्हा वेळ येते तेव्हा सरकारी कारभार कसा असतो याचा चांगलाच प्रत्यय नगर येथील एका महिला कर्मचाऱ्याला आला आहे. नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊन करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले असल्याने रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता नाही.

नगर महापालिकेच्या रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उघड्या टेम्पोतून प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडला असून ह्या प्रकारचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात काम करणाऱी एक महिला कर्मचारी दोन दिवसांपासून आजारी होती. शंका आल्याने त्यांनी खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून घेतली. तपासणीचा अहवाल काल दुपारी हाती आला आणि त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. रुग्णवाहिका ,कोव्हिड सेंटर आणि खाजगी हॉस्पिटल याच्या शोधात त्या महिलेच्या सुनबाई फिरत होत्या मात्र त्यांना सगळीकडून नकारघंटाच ऐकायला मिळाली.

विशेष म्हणजे सदर रुग्णाच्या सुनबाई ह्या देखील सरकारी नोकरीत आहेत मात्र तरीही मनपाचे कोव्हिड सेंटर आणि खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा मिळू शकली नाही. महापालिकेच्या उपनगरातील एका कोव्हिड सेंटरमध्येही त्या गेल्या होत्या तिथे त्यांना जागा उपलब्ध नसल्याचे सांगून खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितलं. खासगी हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णास दाखल करून घेण्यात आले नाही .

अखेर सुनबाईने सासूस सरकारी हॉस्पिटलला दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र तरीदेखील रुग्णवाहिका ही एक अडचण होतीच, दुर्दैवाने संपर्क करूनही रुग्णवाहिका मिळेना. शेवटी एका नातेवाईकांचा मालवाहू रिक्षा टेम्पो बोलावण्यात आला आणि त्यातून सासूबाईंना सरकारी हॉस्पिटलपर्यंत नेऊन मग दाखल करण्यात आले. सुनबाईस पीपीई किट देण्याची माणुसकी मात्र कोविड सेंटरकडून दाखवण्यात आली.

रुग्णसेवेतील कर्मचाऱ्यांना करोनायोद्धा संबोधले जात असताना जेव्हा त्यांच्या जिवावर बेतते तेव्हा कोणीच मदतीला येत नाही. याचा अनुभव आम्ही स्वतः घेतला आहे . मुळात महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी योग्य ती दक्षता घ्यायला हवी, त्यांची तपासणी व्हायला हवी. आवश्यक सुविधा मिळायला हव्यात. अशाही परिस्थिती काम करणाऱ्यांना जर लागण झाली तर उपचारासाठी तरी तत्परता हवी. आमच्या वाट्याला असे प्रसंग येत असतील तर सामान्यांचे काय हाल होत असतील, अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे .


शेअर करा