मी एकटा पडलोय, प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना काय म्हणाले सुजय विखे ?

शेअर करा

नगरमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पाच दिवसांचा कर्फ्यू लावावा, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली होती. तसे पत्रही सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले होते. मात्र लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये स्पष्ट करण्यात आल्याने सुजय विखे यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. सुजय विखे यांनी ” प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय ” अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे .

काय म्हणाले नक्की सुजय विखे ?

सुजय विखे म्हणाले, ‘अहमदनगर जिल्ह्यात करोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मी अनेकवेळा लॉकडाऊन बाबत डॉक्टर या नात्याने भूमिका मांडली. पण मलाही मर्यादा आहेत. प्रशासन माझे ऐकत नाही. मी एकटा पडलोय. आता जनतेनेच स्वतः कर्फ्यू लावून घरात थांबण्याचे आवाहन मी करू शकतो. सध्या मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्याकडे म्हणणे मांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक डॉक्टर या नात्याने काय केले पाहिजे, याची सूचना मी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना केली. लॉकडाऊन बाबत विनंती करण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नाही. कारण मी स्वतः जाऊन प्रत्येक घर बंद करू शकत नाही “.

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले, ‘ नगरमध्ये करोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी प्रशासन ते मान्य करण्यास तयार नाही. प्रशासन माझे ऐकत नसल्यामुळे मला जनतेसमोर खुले आवाहन करावे लागत आहे. सध्या माध्यमे जागृत असल्यामुळे करोना बाधितांचे आकडे बाहेर येत आहेत. नगरमध्ये तर एका रुग्णाला चक्क टेम्पोमध्ये टाकून नेल्याचा प्रकार बाहेर आला आहे. उद्या अशा गोष्टी तुमच्या ओळखीत होतील तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव होईल. परिस्थिती हाताबाहेर असतानाही प्रशासन बैठकीत कोणते आकडे सांगतात व कोणते नाही, ही त्यांचीच जबाबदाही आहे ‘

‘ लॉकडाऊन झाला नाही तर दररोज सहाशे ते सातशेवर करोना बाधितांचा आकडा जाऊ शकतो. लॉकडाऊन हा काही आजार थांबविण्यासाठी नाही. पण आज रुग्णांना हॉस्पिटलमध्ये झोपण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे पुढाऱ्यांना फोन करून बेड मिळवण्यासाठी वशिला लावावा लागतोय. हॉस्पिटलं मोकळी व्हावीत व पुढच्या परिस्थितीसाठी बेड रिकामे व्हावेत, यासाठी कर्फ्यू लावणे महत्त्वाचे आहे ‘


शेअर करा