पुण्यात पुन्हा निर्बंध ? महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ‘ सूचक ‘ वक्तव्य

पुण्यात कोरोनाचा मोठा विस्फोट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे.पुणे महापालिकेची कोरोना आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केलं असून पुण्यातल्या निर्बंधाविषयी त्यांनी भाष्य केले असल्याने पुण्यात पुन्हा निर्बंध लागण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे .

निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं असून क्वॉरंटाईनसाठी पुन्हा हॉटेल सुरु करण्यात येणार आहेत. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीनं पोहोचणं महत्त्वाचं असल्यानं त्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील महापौर म्हणाले आहेत.

पुण्यात दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसत असल्याचे पाहून प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे .27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या चौपट झाली असल्याने चिंता वाढलेली आहे. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जातं असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेली बाधित होताना दिसत असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.

गेल्या 8 दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं असून महापालिका त्या अर्थानं सुसज्ज असल्याचंही महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे. जम्बोचे स्ट्रक्चरल ॲाडिट केले आहे. 24 तासात मशिनरी सुरु होईल याचे नियोजन केलं असून गरज भासल्यास सुरु होणार, असंही ते म्हणालेत. तसंच 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 340 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापौरांनी कोरोना आढावा बैठकीत दिली.