तुमच्या ‘ ह्या ‘ ठिकाणातून स्वॅब घ्यावे लागेल, कोविड लॅबमध्ये तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार ?

शेअर करा

कोरोनाचे थैमान देशभरात सुरु असल्याने सर्व जण आपापल्या परीने कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज झालेले आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे मात्र आरोग्य यंत्रणेत देखील काही विकृती असल्याने अशा विकृतांचे देखील काही प्रकार चांगलेच चव्हाट्यावर येत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथे कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून संबंधित तरुणीने लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या अल्पेश अशोक देशमुख (३०, रा. पुसदा, जि. अमरावती) यावर गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा आरोप केलेला आहे .

उपलब्ध बातमीनुसार, फिर्यादी २४ वर्षीय तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील २० जणांचे २८ जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या देशमुखने फिर्यादी मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.

फिर्यादी तरुणीने सदरची बाब ही आपल्या दुसऱ्या महिला सहकाऱ्यास सांगितली. तपासणीसाठी महिला कर्मचारी नाही का ? असे विचारले असताना महिला कर्मचारी नसल्याचे संबधीत तरुणाने सांगितले मात्र तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेण्याची संमती दर्शवली. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली आणि टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले.

झाल्या प्रकारानंतर संबंधित तरुणी घरी गेली आणि घरी गेल्यावर सदर तिचे तिच्या भावाशी बोलणे झाले. अशा प्रकारे कोरोना टेस्ट होत नाही हे भावाला माहित होतेच मात्र तरीही डॉक्टरांना विचारण्यात आले. डॉक्टरांनी देखील अशा प्रकारे कोरोना टेस्ट होत नसल्याचे सांगितल्यावर तरुणीला धक्काच बसला. त्यानंतर ह्या युवकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला असून बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह अ‍ॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

ह्या घटनेची माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यापर्यंत देखील पोहचली असता त्यांनी, “अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे ” अशी माहिती दिलेली आहे . अशा प्रकारे कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो यामुळे येत्या काळात महिलांनी सजग राहण्याची गरज आहे .


शेअर करा