नाशिक हादरले..फॅशनेबल राहण्याला टवाळखोर मुलांची ‘ वाईट नजर ‘ लागली अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथे उघडकीस आली असून शहरातील जाफरनगर भागात राहणाऱ्या आशिया मोहंमद कासीम ( वय 20 ) या तरुणीने गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेमाला आणि छेडछाडीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . घटना उघडकीस आल्यावर संताप व्यक्त केला जात असून तरुणावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मालेगाव शहरातील जाफर नगर भागात राहणाऱ्या आशिया आणि जाफरीन या दोन भगिनी स्वतः शिक्षित असून समाजाच्या रूढी परंपरेव्यतिरिक्त स्वतंत्र राहणे पसंत करणाऱ्या होत्या मात्र याच कारणामुळे परिसरातील टवाळखोर मुलांनी त्यांची छेडछाड सुरु केली होती. शहरात त्यांचे ब्युटीपार्लर देखील असून त्यांच्या फॅशनेबल राहणीमान आणि सुंदरतेवर गल्लीतील टवाळखोर मुलांची वक्रदृष्टी पडली आणि त्यांनी त्यांना येता जाता त्रास देणे सुरु केले .

टवाळखोर मुलांच्या याच टोळीतील एक युवक अनेक वर्षांपासून या तरुणीस ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. मुलाच्या सोबत असलेल्या काही गुंडांनी मुलीच्या घरावर चक्क हल्ला केल्याचा देखील प्रकार समोर आला होता आणि गल्लीतील लोकांनी देखील दुर्दैवाने दोन्ही बहिणींना यावेळी साथ दिली नाही. कुणीच आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्यास साथ देत नाही, या भावनेतून आशिया हीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

आशियाची बहीण अफरीन हिने आशियाच्या आत्महत्येनंतर पत्रकार परिषद घेऊन, ‘ आशियाचा बळी टवाळखोर युवकांनी घेतला की समाजातील धार्मिक पगड्याने.. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.’ असा प्रश्न विचारत धार्मिक कट्टरवाद्यांना चांगलेच फटकारले आहे. पवारवाडी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र आता नातेवाईकांच्या तक्रारीनंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.


शेअर करा