मोठी बातमी..कैलास गिरवले मृत्यू प्रकरणात अखेर ‘ ह्या ‘ पोलिसांवर गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरातील माजी नगरसेवक कैलास गिरवले यांना ताब्यात घेऊन काठीने बेदम मारहाण करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पुणे येथील राज्य अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याने या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांना शिक्षा होण्याची शक्यता वाढलेली आहे.

राज्य अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक वैशाली मुळे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येऊन मंगळवारी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर घटनेच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या रवींद्र कर्डिले आणि विजय ठोंबरे यांच्यासह इतर जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर नगर शहरातील राजकारण ढवळून निघाले होते. आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर राजकीय कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरच राडेबाजी केल्यानंतर नगर पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ८ एप्रिल २०१८ रोजी रात्री साडेबारा वाजता कैलास गिरवले यांना माळीवाडा येथील त्यांच्या स्थानिक घरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते .

तत्कालीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैलास गिरवले यांना दोन पोलिस कर्मचारी काठीने मारहाण मारहाण करून दुखापत करत असल्याचे दिसून आले होते. या फुटेजच्या आधारे राज्य अन्वेषण विभागाने तत्कालीन पोलीस नाईक रवींद्र कर्डिले आणि विजय ठोंबरे यांच्यासह इतर जणांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना तीन वर्षाचा कारावास किंवा आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा सोबत अशा पद्धतीची आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता वाढलेली आहे.


शेअर करा