नगर ब्रेकिंग..संगमनेरनजीकच्या ‘ त्या ‘ मृतदेहाचे रहस्य अखेर उलगडले

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर नजीक घुलेवाडी शिवार येथे उघडकीस आली होती. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गानजीक एका वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती, मात्र सदर युवकाची ओळख पटली असून संगमनेर पोलिसांनी एक जणाला ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील किशोर डोके यांच्या हॉटेलमध्ये अमोल मोहन तरकसे ( राहणार तर्कसवाडी तालुका राहता ) हा कुक आणि मनोज बाळासाहेब रहाणे ( राहणार चंदनापुरी तालुका संगमनेर ) वेटर म्हणून काम करत होते, मात्र त्यांच्यात वाद होत असल्याने डोके यांनी दोघांनाही कामावरून काढून टाकले होते.

12 नोव्हेंबर 2021 ला दोघांनी संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे एका हॉटेलमध्ये मद्य प्राशन केले आणि दुचाकीवरून ते घुलेवाडी शिवारात गेलेले असताना त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्या वेळी संतप्त मनोजने अमोल यास मारहाण केली आणि त्याचे डोके दगडावर आपटले त्यामुळे अमोल याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करत मनोज याने तिथून पलायन केले.

गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपीची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने सूत्रे फिरवत आरोपी मनोज राहणे यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यामागील कारण देखील सांगितलेले आहे. पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, कॉन्स्टेबल सुभाष बोडके, प्रमोद गाडेकर यांच्या पथकाने विक्रमी वेळेत आरोपी गजाआड केल्याने पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.