पुण्यातील ‘ त्या ‘ कार्यक्रमातही आक्षेपार्ह वक्तव्य, कालिचरण आता पुणे पोलिसांच्या ताब्यात

शेअर करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द बोललेला तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर भाषण केलेला कालीचरण याला खडक पोलिसांनी बुधवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. रायपूर येथील न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेत त्याला बेड्या ठोकत पुण्यात आणण्यात आले आहे.

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे 19 डिसेंबरला नातूबाग मैदानात अफजलखान वधाचा आनंदोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमात कालीचरण ( जिल्हा अकोला ) याच्यासह समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे हे सहभागी झाले होते. संबंधित कार्यक्रमात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करण्यात आल्याने कालीचरण याच्यासोबत एकबोटे आणि इतर आयोजकांवर देखील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सदानंद ढगे यांनी याबद्दल फिर्याद दिली होती.

कालीचरण याने रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते म्हणून त्याला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. नातूबाग मैदानावरील कार्यक्रमात देखील कालीचरण याच्यासह मिलिंद एकबोटे व इतरांनी इतर धर्मियांच्या भावना दुखावतील अशी अनेक व्यक्तव्य केली. धार्मिक श्रद्धांचा अपमान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर कालीचरण याला जेरबंद करून पुण्यात आणण्यात आले आहे. कालीचरण याला सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.


शेअर करा