नगर ब्रेकिंग..शेवगावच्या ‘ त्या ‘ प्रकरणात अधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याच्या यंत्रात पाय अडकून पंधरा दिवसांपूर्वी एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला होता. मयत तरुणांचे वडील ज्ञानेश्वर नलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्यातील दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ ज्ञानेश्वर नलगे ( वय 20 राहणार आंतरवली तालुका शेवगाव ) असे मयत तरुणाचे नाव असून कारखान्याच्या बॉयलर विभागात यंत्रात पाय अडकून झालेल्या दुर्दैवी घटनेत 25 डिसेंबरला त्याचे निधन झाले होते.अधिकाऱ्यांनी सदर कामी निष्काळजीपणा केला असल्याचे वडिलांचे म्हणणे असून याप्रकरणी अधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘ सौरभ नलगे हा नजीकच्या बाभुळगाव तालुका शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्यात काम करत होता. त्याने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नसताना आणि तो कुशल कामगार नसतानादेखील कारखाना प्रशासनाने जोखीम असलेल्या धोकादायक आणि ज्वलनशील विभागात त्यांची नेमणूक केली होती.

कारखान्याने असे करताना भविष्यात काही धोका होऊ शकतो याचा विचार केला नाही आणि आणि कामादरम्यान सुरक्षेची कोणतीही साधने त्याला देण्यात आली नव्हती. त्याची तब्येत ठीक नसताना देखील त्यास पर्यवेक्षक असलेल्या अधिकाऱ्याने कामावर बोलून घेतले आणि त्यानंतर 25 डिसेंबर रोजी दुपारी एक ते दीड च्या सुमारास अंकुश नलगे याने वडील ज्ञानेश्वर नलगे यांना फोन करून मुलाचा अपघात झाल्याचे सांगितले होते.