पुणे हादरले..’ खून का बदला खून ‘, नगर रोडवर भर रस्त्यात रक्ताचा सडा

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पहायला मिळत आहे अशीच एक घटना समोर आली असून आधीची खुन्नस मनात धरून पुण्यानजीक नगर रोडवरील लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी दोन जणांचा खून करण्यात आलेला आहे . मयत व्यक्ती हे मुलगा आणि वडील असून मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या वडिलांवर देखील हल्लेखोरांनी वार केल्याने वडिलांचा देखील जागीच मृत्यू झाला.प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार शिंदे (वय 55) अशी खून झालेल्या बाप लेकाची नावे आहेत

मागील वर्षी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोल्ड मॅन सचिन शिंदे याचा गोळी झाडून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील आरोपी इतके दिवस तुरुंगात होते. त्यातील एक आरोपी सनी शिंदे नुकताच सुटून बाहेर आला होता. बुधवारी संध्याकाळी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टिक आणि दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला आहे. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास लोणीकंद मराठी शाळेपासून शिंदे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मागील वर्षी गोळ्या झाडून सचिन शिंदेचा खून करण्यात आला होता आणि या प्रकरणात पोलिसांनी सनी शिंदे सह तिघांना अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्याने सनी शिंदे हा तुरुंगातून बाहेर आला होता. बुधवारी सायंकाळी तो वडिलांसह लोणीकंद परिसरातून चारचाकी गाडीने जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांना अडवले आणि दगड, कोयता आणि बेसबॉलच्या स्टिकने मारहाण करायला सुरु केले.

मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील कुमार शिंदे हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले असता आरोपींनी त्यांच्यावर देखील वार केले. आरोपी यांनी खूनाच्या दृष्टीनेच तयारी केली असल्याचे दिसून येत असून त्यांच्या हल्ल्यात मुलगा आणि वडील दोघेही मृत्युमुखी पडले. माहिती मिळताच लोणीकंद पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, ‘ सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी गोळीबार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणात सनी शिंदेसह तिघांना अटक करण्यात आली होती. सुमारे ३ महिन्यांपूर्वी सनी शिंदे याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता ‘. सनी शिंदे बाहेर येताच पुन्हा टोळीयुद्ध सुरु झाल्याने आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिसांपुढे आहे .