नगर हादरले..सेवानिवृत्त पोलिसाला भर रस्त्यात खाली पाडून तोंडात ओतले विष

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नगर इथे उघडकीस आली असून सुनेने चक्क पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या सासऱ्याला भर रस्त्यात अडवत खाली पाडून विष पाजण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर नजीक शेंडी बायपास रोडवर हा प्रकार झालेला असून असून महिलेनं अन्य दोघांच्या मदतीने आपल्या सासऱ्याला रस्त्यात अडवत खाली पाडून सासऱ्याच्या पायावर बसून हा प्रकार केला आहे . पीडित सासऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनेसह अन्य दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ग्यानदेव नामदेव जाधव असं 60 वर्षीय फिर्यादी सासऱ्यांचं नाव असून ते पोलीस दलातून निवृत्त झालेले आहेत. नगर जवळील बोल्हेगाव नजीक गांधीनगर परिसरातील रहिवासी आहेत तर सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपी नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता परिसरातील शेंडी बायपास येथील रहिवासी असल्याचे समजते.

घटना घडली त्या दिवशी शनिवारी दुपारी फिर्यादी ग्यानदेव जाधव हे पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथून आपल्या मुलाकडे दुचाकीने चालले होते. शेंडीबायपासने वडगाव गुप्ता शिवारातील नदीजवळून जात असताना त्यांची सून सोनाली हिने हात दाखवून जाधव यांची दुचाकी थांबवली आणि फिर्यादी ग्यानदेव जाधव आपली दुचाकी डबल स्टॅन्डवर लावत असतानाच सुनेनं अचानक फिर्यादी यांना खाली पाडलं आणि त्यांच्या पायावर बसली.

ग्यानदेव जाधव यांना सून पायावर बसलेली असल्याने काही हालचाल करता येईना हे पाहून दुसरा आरोपी बाळासाहेब याने जाधव यांचे हात धरले आणि तिसरा आरोपी वैभव याने जाधव यांचे नाक दाबून त्यांच्या तोंडात विष ओतलं. संतप्त सून यावेळी , ‘ तू निवृत्त पोलीस असल्याने तुझ्यावर मी दाखल केलेल्या गुन्ह्यात तुला पोलीसांनी अटक केली नाही. आता इथे तुला कोण वाचवणार ? ‘ असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ करत होती.

ग्यानदेव जाधव यांना अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जावून जाधव यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पीडित सासऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुनेसह अन्य दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु असल्याचे समजते.