नगर ब्रेकींग..राहुरीत हॉटेलवर ‘ नको ते ‘, संदीप मिटके यांच्या पथकाने घेरले अन ..

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉजवर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे अनेक प्रकार याआधी देखील उघडकीस आलेले आहेत. नगर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना समोर आली असून राहुरी पोलिसांनी राहुरी खुर्द येथे बुधवारी बारा तारखेला एका हॉटेलसह दोन ठिकाणी छापे घालून तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. यावेळी दोन जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

पोलीस कर्मचारी स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फरहाद इर्शाद अहमद सय्यद ( राहणार बुवा सिंदबाबा दर्ग्यासमोर राहुरी ) व महिला पोलीस कर्मचारी मीना नाचण यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजू शिवाजी इंगळे ( राहणार इंदिरा नगर प्रभाग क्रमांक सहा श्रीरामपूर ) या अटक केलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल न्यू भारत तसेच एका हॉटेल शेजारी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांच्या टीमकडून दोन्ही ठिकाणी बनावट ग्राहक पाठवण्यात आले. सदर प्रकार सुरू असल्याची खात्री होताच छापे टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली तसेच सय्यद आणि इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पथकातील मधुकर साळवे, नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, गणेश फाटक, इफ्टीकार सय्यद, चांद सय्यद, स्वाती कोळेकर, मीना नाचण यांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.