नगर जिल्ह्यात महिलेची रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ, आरोग्य अधिकारी म्हणतात की ..

महाराष्ट्रात आरोग्य सुविधांचा बोजवारा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन ही बाब काही नवीन नाही. अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे उघडकीस आली असून एका तीस वर्षीय महिलेची चक्क रस्त्यावर प्रसूती करण्याची वेळ आलेली आहे. देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी सदर महिलेस उपचारासाठी दाखल करून घेतले नाही, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी डोंगरगण येथील एका महिलेला असाच अनुभव नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आला होता.

गुरुवारी सकाळी सहा वाजता राहुरी फॅक्टरी येथील कोमल अरुण शिंदे ही महिला बाळंतपणासाठी रुग्णालयात आली होती मात्र आरोग्य केंद्रात तिला दाखल करून घेण्यात आले नाही म्हणून सदर महिलेची चक्क रस्त्यावर प्रसूती करण्याची दुर्दैवी वेळ आली. परिसरातील महिलांनी परिस्थितीचे भान ठेवत नगरपालिकेच्या भिंतीजवळ नेऊन साड्यांचा आडोसा करून तिथे आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेला बोलावून नवजात बाळाची नाळ कापण्यात आली आणि महिलेला आरोग्य केंद्रात नंतर पोहोच करण्यात आले.

दुसरीकडे कोमल तिचे पती अरुण शिंदे यांच्या म्हणण्यानुसार मात्र, ‘ तिला मोठ्या प्रमाणात पोटात वेदना होत होत्या आणि मोठ्या दवाखान्यात नेण्याची आमची परिस्थिती नाही म्हणून बाळंतपणासाठी तिला येथे आणले होते मात्र वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी आम्हाला तिथून अक्षरश: हाकलून लावले म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी , ‘ अशी मागणी करण्यात आली.

सदर महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात आली तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे रिपोर्ट पाहिल्यानंतर बाळंतपणाची तारीख की 15 फेब्रुवारी 2022 अशी दिलेली असल्याने तिला घरी जाण्यास सल्ला दिला तसेच परिचारिकेच्या म्हणण्यानुसार तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता म्हणून आम्ही तिला असा सल्ला दिला असे म्हटले आहे तसेच सूत्रांच्या माहितीनुसार सदर महिलेचा पती हा त्यावेळी दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचे देखील समजते.

आरोग्य अधिकारी डॉक्टर अण्णासाहेब मासाळ यांनी म्हटले आहे की, ‘ कोमल शिंदे नावाची महिला सकाळी प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली होती. आमच्या नर्सने तिला तपासले मात्र ती उपाशी असल्याचे समजल्यानंतर तिला बाहेरून काहीतरी खाऊ ये असा सल्ला दिला मात्र तिची तिकडेच प्रसुती झाल्याचे आम्हाला समजले . ‘