नगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी ‘ तो ‘ अहवाल अद्यापही नाही , कारवाई लटकलेलीच.

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाला मात्र घटनेला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर देखील चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सदर घटनेमध्ये नक्की दोषी कोण हे स्पष्ट झालेले नाही. विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठवलेल्या अहवालावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काहीही कारवाई केलेली नाही.

नगर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भाऊबीजेच्या दिवशी ६ नोव्हेंबर २०२१ रोजी भीषण आग लागली होती. त्यावेळी कोरोना कक्षात 17 रुग्ण उपचार घेत होते त्यातील 14 रुग्णांनी आत्तापर्यंत प्राण गमावले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमली गेली मात्र समितीने पाठवलेला अहवाल शासनाने अद्याप उघड केलेला नाही तसेच मोठ्या प्रमाणात कुठली कारवाई देखील केली गेलेली नाही.

जिल्हा पोलिस यंत्रणेने तपास सुरू केला त्यामध्ये तीन परिचारिका आणि एका महिला वैद्यकीय डॉक्टरला अटक करण्यात आली होती. विद्युत निरीक्षक अहवाल यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले होते मात्र विद्युत निरीक्षक यांचा अहवाल न आल्याने पोलीस तपास थांबलेला आहे तर दुसरीकडे सरकारकडून न्याय मिळेल अशी आशा मृतांचे नातेवाईक अद्याप देखील बाळगून आहेत.

सदर अग्निकांड प्रकरणी निलंबन सोडले तर इतर दोषी कोण हेच अद्याप समोर आलेले नाही तर आगीचे साधे कारण देखील तपास यंत्रणा शोधू शकत नाही का ? अतिदक्षता विभागात आग लागून जर 14 रुग्णांचा मृत्यू होत असेल तर हे अपयश कुणाचे याकडे शासकीय यंत्रणा का डोळेझाक करत आहे ? असा प्रश्न नगरकरांना पडलेला आहे. आज या आगीचे कारण समोर आले तेर भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील मात्र त्यासाठी इच्छाशक्ती सरकारदरबारी पहायला मिळत नाही.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील नगर जिल्ह्यातील असून जिल्हा रुग्णालयात आग का लागली ? याचा अहवाल महावितरणकडून मागवण्यात आलेला आहे मात्र महावितरणने अद्याप देखील हा अहवाल दिलेला नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर मंत्रालयाकडून काय कारवाई होईल ? हा देखील एक प्रश्न आहे . ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अहवाल न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील जिल्ह्यात जोर धरते आहे.

नगर जिल्ह्यात कोरोनाची लाट पुन्हा सुरू झाल्यानंतर पोलीस तपासासाठी सील करण्यात आलेला अतिदक्षता विभाग कक्ष पोलिसांनी उघडून दिला असून आता त्या कक्षाची दुरुस्ती चालू असल्याचे समजते. त्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना न्याय मिळेल याची आशा देखील मावळलेली पाहायला मिळते आहे.