नगरमध्ये ‘ बुलेट स्पेशल ‘ चोर धरले , पांढरीपूल इथे ठोकल्या बेड्या

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्यासह पुणे आणि बीड जिल्ह्यातून महागड्या बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नगर एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करत अटक केली आहे. पांढरीपुल येथे शुक्रवारी हा प्रकार घडला असून दोन्ही आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड ( राहणार हर्षवर्धन नगर तपोवन रोड ), अशोक संजय गीते ( राहणार केडगाव तालुका पाथर्डी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींचा सहकारी साथीदार सुधीर कडूबाळ सरकाळे ( राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव ) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींकडून 4 लाख 80 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष पठारे ( राहणार रांजणगाव तालुका शिरूर ) यांनी मोटर सायकल चोरीला गेल्याची तक्रार सुपा पोलिस ठाण्यात दिली होती. ही मोटरसायकल सोमनाथ आव्हाड याने चोरली असून तो पांढरीपुल येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली असताना आरोपी पांढरी पूल येथे असल्याचे समजले. पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांची देखील नावे सांगितल्यानंतर त्यापैकी अशोक संजय गीते याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण यांचा समावेश होता .


शेअर करा