नगर ब्रेकिंग..इतरत्र ‘ जोडे मारो ‘ मात्र काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे चक्क ‘ तिळगुळ ‘ ?

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर भाजपचा चांगलाच थयथयाट झालेला दिसून येत आहे. नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करणे इथपर्यंत आंदोलने करण्यात आली मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेर येथे मात्र भाजपने केलेले आंदोलन अगदीच मिळमिळीत ठरलेले आहे. भाजपच्या आंदोलनात संगमनेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमात्मक फलकासमोर ‘ तिळगुळ खाऊन गोड बोलण्याचा सल्ला दिल्याचे ‘ आंदोलन केलेले आहे.

संगमनेर बसस्थानकासमोर झालेल्या आंदोलनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओचा संदर्भ देत निषेध करण्यात आला तसेच या विधानामुळे जनतेच्या भावना दुखावल्या, असे देखील म्हणण्यात आले. पटोले यांच्या वादग्रस्त विधानाची दखल घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करावी अन्यथा भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.

भाजपच्या या तिळगुळ आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा झाली असून या आंदोलनात भाजपचे शहर अध्यक्ष एडवोकेट श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, तालुका सरचिटणीस वैभव लांडगे, भारत गवळी,भगवान गीते यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्यात भाजपचा प्रभाव असलेल्या भागात चक्क ‘जोडे मारो ‘ अन काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात चक्क ‘ तिळगुळ ‘ यामुळे अशा आंदोलनाची कारणे काय असावीत याची शहरात चर्चा रंगली आहे .