‘ लग्न कधी करतोस ? ‘, बॉयफ्रेंडच्या रूममध्ये घुसुन तरुणीने केला प्राणघातक हल्ला

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक अशा घटना समोर येत असून किरकोळ कारणावरून नागरिक कायदा हात घेत असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहे. नागपुर इथे मात्र याहून पुढे जात एका महिलेने लग्नास टाळाटाळ करत असलेल्या तरुणावर चक्क चाकूने हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे . ‘माझ्यासोबत लग्न का करत नाही’ असे म्हणत या तरुणीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यावर वार केले.

उपलब्ध माहितीनुसार , अक्षय कृष्णाजी ढोके (वय २७) असे जखमी युवकाचे नाव आहे. तर पूजा गोस्वामी (३०) असे अटकेतील आरोपी महिलेचे असल्याचे समजते. अक्षय हा (गुरुप्रसादनगर, प्लॉट नंबर ४२, दत्तवाडी) येथे तीन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या रूममधील त्याचे इतर मित्र हे मकरसंक्रांतीनिमित्त गावी तिळगुळ घेण्यास गेले होते. रूममध्ये अक्षय एकटाच असल्याने त्याला सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याची घटस्फोटित मैत्रिण पूजा गोस्वामी ही त्याला भेटण्यास आली.

पूजासोबत अक्षयची दोन ते तीन वर्षांपासून मैत्री असून त्यांचे हे प्रकरण समोर आल्यावर पूजा हिच्या पतीने तिला घटस्फोट दिलेला आहे त्यामुळे ती अक्षय याला ‘ आपण लग्न करूयात ‘ म्हणून पाठीमागे लागलेली होती मात्र आर्थिक स्थिरता नसल्याने अक्षय लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. अक्षय रूमवर एकटाच असल्याची माहिती पूजाला मिळाली आणि ती ‘ लग्न कधी करणार ? ‘ याची विचारणा करण्यास त्याच्या रूमवर पोहचली. आपल्याला तिळगुळ घेऊन आली असेल असा अक्षयचा समज झाला आणि त्याने तिला रूममध्ये घेतले.

रूममध्ये पूजा आल्यावर तिने पुन्हा अक्षय याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली आणि वादाला सुरुवात झाली. पूजाने अक्षयच्या आईला देखील काही दिवसांपूर्वी फोन केला होता. यावेळी तिने ‘अक्षय माझ्यासोबत लग्न करणार नसेल तर मी त्याला सोडणार नाही, त्याचा जीव घेईन’ अशी धमकी दिली होती. रूमवर पोहचल्यावर अक्षयने लग्न करण्यास नकार दिल्याने पूजाने चाकूने अक्षयच्या अंगावर वार केले त्यामुळे तो जागीच रक्तबंबाळ झाला आणि पळू लागला.

पूजाच्या तावडीतून सुटत अक्षय जीव वाचविण्यासाठी अर्धा किलोमीटर दत्तवाडी चौकापर्यंत तो पळाला आणि मग नागरिकांनी त्याला पूजा हिच्या तावडीतून सोडवून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अक्षयची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून वाडी पोलिसांनी पूजा गोस्वामी हिला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा