संसार म्हटले की एकमेकांवर विश्वास हा हवाच मात्र अनेकदा असे होत नाही आणि विवाहबाह्य संबंधातून वेगळीच प्रकरणे उघडकीस येतात. अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली असून पुणे शहरातील एका विवाहित महिलेने आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी चक्क तो वापरत असलेल्या चारचाकी गाडीला त्याला माहिती न देता जीपीएस यंत्रणा बसवली आणि त्याच्या आधारावर त्याच्यावर पाळत ठेवायला सुरू केले. नवऱ्यावर पाळत ठेवत असताना त्याची गाडी पुण्यातीलच एका हॉटेलमध्ये असल्याची तिची खात्री झाली आणि तिने दुसऱ्या महिलेसोबत आपल्या नवऱ्याला रंगेहाथ लॉजमध्ये पकडले. सदर प्रकरणात महिलेचा संशय खरा ठरला असून अरिफ अब्दुल मांजरा (वय ४१, रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी अरिफ मांजरा याच्या पत्नीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एक फेब्रुवारीला फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटले आहे की ,फिर्यादी महिलेचा आणि आरोपी अरिफ यांचा २००५ मध्ये सुरत येथे विवाह झाला होता. लग्नानंतर फिर्यादीचा आरोपी पती अरिफ हा कामानिमित्त बेंगळुरू येथे जात होता मात्र तो सांगत असलेली कारणे संशयास्पद आढळून येत असल्याने फिर्यादीने आरोपी पती अरिफच्या चारचाकी वाहनामध्ये जीपीएस डिव्हाईस बसवून ठेवले.
जीपीएसवरून पाळत ठेवणे सुरु केल्यावर २१ ऑक्टोबर २०२० रोजी पतीचे लोकेशन हे बावधन येथील व्हिवा इन हॉटेल हे आढळून आले. फिर्यादीने इंटरनेटवरून हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळवला आणि ‘ अरिफ हॉटेलमध्ये आले आहेत का ?’ अशी चौकशी हाॅटेलमध्ये फोन करून केली त्यावेळी अरिफ आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी असल्याचे हॉटेलमधून समजले, हे समजताच पत्नीला धक्काच बसला आणि तिने त्या हॉटेलमध्ये विक्रमी वेळेत धाव घेतली.
आरोपी पती अरिफ याच्यासोबत एक महिला चक्क फिर्यादी यांचे बनावट आधारकार्ड वापरून राहत असल्याचे समजले म्हणून फिर्यादी यांनी सीसीटीव्ही खंगाळले असताना दुसऱ्याच एका महिलेला आपला पती आपलेच आधार कार्ड वापरून या हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला फिर्यादीच्या पतीसोबत असल्याचे उघड झाले. फिर्यादीने त्यांच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज रेकाॅर्ड करून घेतले आणि पोलिसात धाव घेतली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.