‘ निव्वळ दिशाहीन ‘ , नगर मनपाच्या रखडलेल्या ‘ ह्या ‘ प्रकल्पांचे झालंय तरी काय ?

शेअर करा

नगर महापालिकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून महापालिकेचे सगळे प्रकल्प आर्थिक निधीअभावी केवळ कागदावरच रखडलेलले आहेत तर दुसरीकडे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडत नसल्याने कर वसुली हा एकमेव पर्याय आहे मात्र त्याला देखील नागरिकांचा सध्या अपेक्षित असा प्रतिसाद सध्या दिसून येत नाही.

महापालिकेचा दिशाहीन कारभार नगरकरांना चांगलाच परिचयाचा झालेला आहे. मागील वर्षी या अर्थसंकल्पात नियोजन केलेल्या चितळे रोड येथील नेहरू मार्केटच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौकात शॉपिंग मॉल, सावेडी गावठाण येथे शॉपिंग सेंटर उभारणे, गंज बाजार इथे भाजी मार्केट यासारखे अनेक प्रकल्प बांधून भाड्याने देऊन त्यातून महापालिकेला आर्थिक निधी उपलब्ध करण्याचे नियोजन होते मात्र प्रत्यक्षात यातील एकही काम मार्गी लागलेले दिसत नाही. महापालिका अधिकारी यांच्याकडून केवळ वेळकाढू धोरण अवलंबिले जात असून सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी इच्छाशक्तीच दिसून येत नाही.

नेहमीच आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या महापालिकेला महापालिकेतील आस्थापना खर्च हाच मुळात 82 टक्क्यावर पोहोचलेला आहे त्यामुळे महापालिका हा पांढरा हत्ती सिद्ध होत असून या हत्तीला पोसण्यासाठी लागणारी कुठलीच आर्थिक तजवीज महापालिकेकडे आढळून येत नाही. निव्वळ करवसुली यावरच महापालिकेचा मुख्य भर असून विकास कामांच्या दृष्टीने देखील कोणतेच नियोजन आढळून येत नाही तर सर्व काही कागदावरच असल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची महावितरणची सध्या सात कोटी रुपये थकबाकी आहे तर नगरसेवक यांनादेखील मानधन दिले जात नाही. दिव्यांग तसेच मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन थकलेले आहे. दर वर्षीच्या अर्थसंकल्पात अथवा महासभेत या विषयावर केवळ चर्चा होते मात्र एकही प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला दिसत नाही तर मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील उदासीनता पहायला मिळत आहे.


शेअर करा