येत्या निवडणुकीला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांनाच उभे करा आम्ही राजीनामा देतो : सुजय विखे संतापले

शेअर करा

‘केंद्र सरकारकडून आलेला कोविडचा निधी खर्च करीत असताना प्रशासनाकडून एकदाही खासदाराला विश्वासात घेतले जात नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. कोविड फंडाबाबत खासदारालाच सूचना करण्याचा अधिकार नसेल, तर आम्ही राजीनामाच देऊन टाकतो,’ अशा परखड शब्दात सुजय विखे यांनी प्रशासनावर निशाणा साधला आहे .असेच होणार असेल तर ‘येथून पुढे निवडणुकीला सुद्धा जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी , तहसिलदार यांनाच उभे करावे,’ असे देखील विखे म्हटले आहेत. खासदार सुजय विखे यांनी याआधी देखील प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल टीका केली होती.

एका संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन नागरी संवादात खासदार सुजय विखे यांनी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते, ‘कोविड फंड म्हणून नगर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून अठरा कोटी रुपये आले. या निधीचा खर्च कसा झाला पाहिजे, हे देखील सांगण्यात आले होते. पण केंद्राकडून आलेल्या या निधीचा खर्च करीत असताना एकदाही खासदाराला विश्वासात घेतले जात नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

चार ऑगस्टला आमची आरोग्य कमिटीची मिटींग असून त्यामध्ये मी हा मुद्दा मांडणार आहे. जर कोविड फंड हा केंद्र सरकारचा आहे, आणि त्यात खासदाराला सूचना करण्याचा अधिकार नसेल तर आम्ही राजीनामा देऊन टाकतो. आम्ही कशाला निवडून आलो ? आमच्या कुटुंबाने कशाला पन्नास वर्ष या जिल्ह्यातील राजकारणात जनतेसाठी घातली ? मी कशाला तीन-चार वर्ष मेहनत घेऊन निवडणूक लढवली ? मी निवडणूक जिंकून खुर्चीवर बसलो आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा देऊन खुर्चीवर बसलो नाही,’ असा टोलाही त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.

‘आमच्या सारख्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जर स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार नसेल, आम्ही मांडलेल्या मुद्द्यांना ग्राह धरले जात नसेल, तर आम्ही लोकप्रतिनिधी होऊन करणार काय ?. जर प्रशासनाला त्यांच्या पद्धतीने कारभार चालवायचा आहे. कलेक्टर यांना वाटत असेल की ते म्हणतील तेच होईल, तालुकास्तरावर तहसिलदार, प्रांताधिकारी म्हणतील तेच होईल, तर ठिक आहे, आम्ही येथून पुढे निवडणूकच लढवणार नाही. आम्ही पुढच्या वेळी म्हणू यांनाच निवडणुकीला उभी करा, आणि यांनाच निवडून आणा, कारण हेच सर्व चालवत आहेत,’

‘लॉकडाऊन बाबत मी मांडलेल्या भूमिकेचे जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना समर्थन करता येत नसेल, तर निदान त्यांनी विरोधात तरी बोलावे. पण त्यांनी आपली भूमिका मांडावी. आज लोकांनी स्वतःला घरात लॉकडाऊन करून घेण्याची गरज आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये. करोना हा सोपा आजार आहे, असे समजू नका. आपल्याला ९९ टक्के धोका नाही, पण एक टक्का धोका आहे, हे लक्षात ठेवा,’ असेही सुजय विखे पुढे म्हणाले.

‘मी जेव्हा सूचना करतो, ती विचारात घेतली जात नाही. त्यामुळे मला वाटते मी डॉक्टर कशासाठी झालो ? मी आपला निवांत शाळेत शिकलो असतो, एखादी डिग्री घेतली असती आणि पुढारी झालो असतो. नगरमध्ये दिवसा गर्दी होते, आणि येथे नाईट कर्फ्यु आहे. या नाईट कर्फ्युचे मला काही लॉजीक समजले नाही,’ अशा शब्दात त्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.


शेअर करा