दिपाली म्हणाली ‘ मी मीटिंग करून देते ‘, पुण्यात 76 वर्षांचा पिडीत म्हणतोय की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. विविध वृत्तपत्रांमधून हायप्रोफाईल महिलांसोबत मैत्री करण्याच्या जाहिरातीला भुलून एका वृद्ध व्यक्तीने एका महिलेला संपर्क केला आणि त्या 76 वर्षाच्या व्यवसायिकाची तब्बल 60 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. दिपाली कैलास शिंदे ( वय 26 राहणार नेताजी नगर वानवडी ) असे या महिलेचे नाव असून मे 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत या व्यावसायिकाला साठ लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी व्यवसायिक यांना मीनाक्षी फ्रेंडशिप क्लबची जाहिरात एका वृत्तपत्रात आढळली होती त्यानंतर त्यांनी एकाकी आयुष्याला वैतागून मैत्रीच्या आशेने संपर्क केला असता आमचा क्लब हा श्रीमंत हायप्रोफाईल महिलांचा क्लब आहे. श्रीमंत हायप्रोफाईल महिलांसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, असे सांगत फिर्यादी यांचा विश्वास तिने हस्तगत केला.फिर्यादी यांना आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर श्रीमंत हायप्रोफाईल महिलांसोबत तुमची मीटिंग करून देण्यासाठी सिक्युरिटी फी म्हणून दोन लाख रुपये भरावे लागतील, असे तिने सांगितले. फिर्यादी यांनी तिला 2 लाख रुपये दिले देखील मात्र त्यानंतर देखील या महिलेने वेगवेगळी कारणे सांगून तिच्या बँक खात्यावर तब्बल साठ लाख रुपये ओढले.

पोलीस तपासात दिपाली शिंदे ही उच्चभ्रू महिलांना फ्रेंडशिप क्लबच्या माध्यमातून अनेक जणांना जाळ्यात ओढून त्यांना हाय प्रोफाइल महिला उपलब्ध करून देऊ, असे सांगत त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. सदर गुन्ह्यांमधील रक्कम घेण्यासाठी तिने स्वतःच्या अकाउंटचा वापर केलेला आहे मात्र शिंदे हिला पुढे करून याप्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे ? यासाठी पोलीस मुख्य आरोपी याचा देखील तपास घेत आहेत. पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संगीता माळी, उपनिरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये अशा स्वरूपाच्या जाहिराती येत असल्याने सदर प्रकरणी या अनेकदा तरुण मुले यांच्यासह अनेक व्यवसायिक देखील अडकत असल्याचे समोर येत असल्याने अशा स्वरूपाच्या जाहिरातींवर बंदी आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. छोट्या जाहिरातीमध्ये अशा स्वरूपाच्या जाहिराती आल्याने तसेच वृत्तपत्र घरोघरी येत असल्याने अल्पवयीन मुले देखील अशा टोळ्यांच्या जाळ्यात अडकू शकतात त्यामुळे केवळ काही पैसे मिळावेत म्हणून गुन्हेगारीस पाठबळ देणाऱ्या या जाहिराती वृत्तपत्रांनी तात्काळ बंद करण्याची गरज निर्माण झालेली आहे.


शेअर करा