नगरच्या विक्रीकर विभागाच्या आतच लावला होता सापळा , इशारा होताच आला जाळ्यात

शेअर करा

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या अनेक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नगर शहरात समोर आलेली आहे. नगर शहरातील वस्तू व सेवा कर भवन येथील राज्यकर अधिकारी रमेश अमृता बुधवंत याला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे नाशिक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून सदर कारवाईचे नगर शहरात कौतुक केले जात आहे.

श्रीरामपूर येथील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वितरण असलेल्या एका व्यावसायिकाने आर्थिक उलाढालीचा ताळेबंद वस्तू व सेवा कर भवनात सादर केला होता. त्यात काही त्रुटी आढळल्याने आरोपीने तक्रारदार यांना वाढीव कर भरण्याबाबत नोटीस बजावली. संबंधित नोटीस रद्द करून कराचा परतावा मिळवून देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीच्या अंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले आणि त्यातील 20 हजार रुपयांचा हप्ता तक्रारदार यांनी आरोपीला बुधवारी दुपारी देण्याचे ठरवले होते मात्र दरम्यानच्या काळात तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क केला आणि पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.

सदर रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना आरोपी याला वस्तू व सेवा कर भवन येथे रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


शेअर करा