महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात समोर आली असून अंड्याची केलेली भाजी खाल्ल्याने त्यातून विषबाधा होऊन आईसह दोन मुली आणि आठ महिन्याचा मुलगा अशा चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आंबेजोगाई तालुक्यात ही घटना समोर आलेली असून त्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, साधना काशिनाथ धारासुरे ( वय सहा ), श्रावणी काशिनाथ धारासुरे ( वय चार ), नारायण काशिनाथ धारासुरे (आठ महिने ) आणि आई भाग्यश्री काशिनाथ धारासुरे ( वय 28 ) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. बागझरी येथील काशिनाथ दत्तू धारासुरे ( वय 31) हे शेतकरी असून त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुलांसह रात्री अंड्याची भाजी खाल्ली होती त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला.
विषबाधा झाल्याची शंका असल्याने त्यांना तातडीने स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच साधना आणि श्रावणी यांचा मृत्यू झाला तर त्यानंतर अवघ्या एक तासाने नारायण या आठ महिन्याच्या चिमुरड्याचा देखील मृत्यू झाला. भाग्यश्री यांची प्रकृती देखील चिंताजनक होती अन त्यांचाही रात्री नऊ वाजल्यानंतर मृत्यू झाला. सव्वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले सदर घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
अंड्याच्या भाजीतून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टरांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील कारण समजू शकेल मात्र बर्दापूर पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केलेला असल्याची माहिती आहे.