नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मिळाल्या नोटिसा.. काय आहे कारण ?

शेअर करा

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत असून अहमदनगर मध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून पोलिसांनी विविध पक्ष व संघटनांना कलम १४९ नुसार नोटीस देण्यास सुरुवात केली आहे त्यात मनसे पदाधिकारी यांनाही या नोटीसा मिळाल्या आहेत.

उद्या अयोध्या मध्ये राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असल्याने अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करताना इतर धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम कळत नकळत होऊ शकते. काहींनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आज पासून विविध संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या नोटीसमध्ये, ‘अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम वेळेस आपण व आपले कार्यकर्ते समर्थक किंवा आपल्या भागात कोणीही कुठल्याही प्रकारचे जल्लोष , विजय मिरवणूक , फटाक्यांची आताषबाजी, घोषणाबाजी , शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावणे या व्यतिरिक्त भूमिपूजनाच्या अनुषंगाने सोशल मीडिया वर होम हवन, सामूहिक पूजा, नमाज पठण व त्यासंबंधित सोशल मीडियावर विशिष्ट फोटो अथवा मजकूर शेअर करू नये व दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची कुठलेही कृत्य करू नये. तसे केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील. जर नोटिशीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही व त्यातून काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा मजकूर आहे.


शेअर करा