.. आणि भैय्या गेले…शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे निधन

शेअर करा

शिवसेनेचे जुने निष्ठावंत आणि तब्बल २५ वर्षे नगर शहराचे आमदार राहिलेले माजी मंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.

दरम्यान, राठोड यांना आठ दिवसापूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. या उपचाराला ते चांगला प्रतिसादही देत होते. मात्र आज पहाटे अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

धनाढ्य मंडळींचे राजकारण झुगारून देत सामान्य कुटुंबातील असे अनिल राठोड हे नगर विधानसभा मतदार संघातून गेले 25 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. नगरकरांनी त्यांना नेहमीच भरभरून प्रेम दिले होते .भैय्या उभे राहिले की दुसरे कोणीच निवडून येऊ शकत नाही असा तो काळ होता . गोरगरिबांच्या कुठल्याही अडचणी असोत त्यांच्यासाठी हक्काचा आधार अनिल भैय्या होते .त्यांच्या निधनाने नगर शहर व जिल्ह्यात शोककळा पसरली आहे .

गोरगरिबांच्या अडचणीसाठी प्रसंगी दुचाकीवर बसून देखील अनिल भैय्या त्यांच्यासाठी धावून जात असत. कोणतीही अडचण आली की नेता सुभाष चौक येथील अनिल भैय्या यांचे ऑफिस सर्वांसाठी खुले असायचे . केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणात शहरातील धनाढ्य आणि गुंडशाहीपुढे आपण हतबल असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शोकसंदेश : मुख्यमंत्री काय म्हणाले ?

अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला. काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, करोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतानाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे

युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले.

नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता, कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला आहे.


शेअर करा