‘ साहेब त्याला सेवेतून बडतर्फ करा ‘, पोलिसांच्या पत्नीनेच केले पतीचे ‘ कारनामे ‘ उघड

शेअर करा

नगर येथे एक वेगळीच घटना समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या आणि मुख्यालयात नेमणूक असलेल्या एका पोलीसाच्या पत्नीने गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे धाव घेत आपल्या पतीने दोन विवाह केलेले असल्याने त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. भविष्य पाहण्याच्या बहाण्याने तो अनेक जणांना फसवत असून त्याचे अनेक कारनामे पत्नीनेच उघड केले आहेत.

पोलीस अधीक्षक यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, ‘ पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या पोलिसाशी 1993 मध्ये आपला विवाह झाला होता. त्यानंतर एक मुलगा आणि एक मुलगी झाली. पोलीस दलात कार्यरत असताना 2002 मध्ये पुणे येथे या पोलिसांने फलज्योतिषविषयक शास्त्र याविषयी एक परीक्षा दिली.

पोलिसात कार्यरत असताना देखील भविष्याची पदवी घेऊन भविष्य पाहण्याचा देखील उद्योग हा करत आहे. अशाच भविष्य पाहण्याच्या कामातून त्याची एका तरुणीशी ओळख झाली आणि त्याने तिच्याशी विवाह बाह्य संबंध ठेवले. अनेक दिवस विवाहबाह्य संबंध ठेवल्यानंतर ती तरुणी गर्भवती झाली आणि तिला एक अपत्य देखील झाले. पोलीस खात्यातील सर्विस बुक मध्ये मात्र त्याने पत्नी आणि दोन मुलांचा उल्लेख केलेला आहे मात्र दुसरा विवाह केल्याची नोंद केलेली नाही तसेच अपत्याची देखील नोंद केलेली नाही.

राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 2005 नंतर तीन अपत्ये झालेली असतील तर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात येते मात्र या पोलिसांने सदर तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले आणि 2012 मध्ये एका अपत्याला जन्म दिला. भविष्य पाहण्याच्या त्याच्या उद्योगातून त्याने अनेक जणांची फसवणूक केली असून याच माध्यमातून तो लाखो रुपये कमवत असल्याने तसेच सरकारची देखील फसवणूक केल्याने त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे म्हटले आहे .


शेअर करा