खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याकडून उड्डाणपुलाचा असाही ‘ मास्टरप्लॅन ‘

नगर शहरात उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून काही महिन्यांनंतर हे काम पूर्ण होण्याची नगरकरांना आशा आहे. उड्डाणपुलाच्या या खांबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे साकारली जाणार असून नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रे आणि सुशोभीकरण करून उड्डाणपूल आणखीनच आकर्षक बनवला जाणार आहे, असे सांगत खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर सादरीकरण करत सुशोभीकरणाची प्रतिकृतीच जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केली आहे.

दहा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते म्हणाले की, ‘ पुण्यातील हडपसरमध्ये उड्डाणपुलाचे जसे सुशोभीकरण झालेले आहे तसेच सुशोभीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र राज्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे यासाठी निधी नाही म्हणून आपण पुढाकार घेतलेला असून त्यात आमदार संग्राम जगताप यांचे देखील सहकार्य लाभत आहे. ‘

उड्डाणपुलाच्या 84 खांबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगाची तसेच शहरातील ऐतिहासिक वास्तूंची चित्रे साकारली जाणार असून 14 खांबांवर वृक्षवेली काढून या उड्डाणपुलाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महाराजांच्या जीवनावरील या चित्रांचे विद्रुपीकरण होणार नाही आणि त्याचे संरक्षण केले जाईल याची देखील जबाबदारी घेण्यात यावी तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उड्डाणपुलाच्या खांबावर स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास चित्रित करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केली आहे .