खाकीला काळिमा, ‘ त्या ‘ गुन्ह्यात चक्क ऑनड्युटी पोलिसच पार्टनर

शेअर करा

महाराष्ट्रात पोलीस दलाला मान खाली घालण्यास लावणारी घटना समोर आलेली असून नाशिक मार्गे मुंबई येथे हवालातील 45 लाखांची रक्कम घेऊन जाणाऱ्या एका मोटरचालकाला मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर तीन व्यक्तींनी पोलिस असल्याचे सांगत त्यांच्या ताब्यातील 45 लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. नारपोली पोलिसांनी या घटनेतील एका आरोपीला पुणे येथून अटक केली आहे तर याच गुन्ह्यात समावेश असलेले पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन संशयित पोलीस कर्मचारी मात्र फरार झालेले आहेत.

काय आहे प्रकरण ?

औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे आठ मार्च रोजी आपल्या मोटारीतून नाशिक येथून व्यापाराची हवाला व्यवहारातील 45 लाखांची रक्कम घेऊन मुंबईत येण्यासाठी निघाले असताना नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील हायवेदिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन जणांनी मोटार थांबून रक्कम घेऊन पोबारा केला होता.

पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पुणे येथून बाबुभाई राजाराम सोळंकी याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून या गुन्ह्याची उकल झाली.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाने यांचादेखील गुन्ह्यात सहभाग उघड झाला आला. सदर कर्मचाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून गुन्हा केला त्यावेळी ते आपल्या सेवेवर कार्यरत होते हे देखील समोर आले आहे. लुटलेल्या या रकमेमधील रक्कम त्यांनी आपसात वाटून घेतले असल्याचची देखील माहिती आहे.


शेअर करा