धक्कादायक.. रुग्णाच्या मनातील कोरोनाच्या भीतीने घेतला तरुण डॉक्टरचा बळी : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

चित्र: प्रतीकात्मक

करोनासंबंधी एवढे प्रबोधन सुरू असतानाही अनेकांच्या मनात कोरोनाची भीती घर करून आहे . कोरोनाच्या कॉलरट्यूनने देखील लोकांमध्ये आणखी भीती पसरत आहे. कोरोनाची भीती मनात घर करून असल्याने डॉक्टरला माहिती देताना देखील लोक खोटी माहिती देतात मात्र अशाच पेशंटकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या माहितीमधून पेशंटवर इलाज करण्यात आले आणि अवघ्या काही दिवसात इलाज करणाऱ्या डॉक्टरला देखील कोरोनाची बाधा झाली आणि त्यातून डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला. नगर येथील एका खाजगी रुग्णालयात हा प्रकार घडला.

सदर डॉक्टर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होते. रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाला त्यांनी तपासले होते. प्राथमिक चौकशीत या रुग्णाने बरीच लक्षणे लपवून ठेवली तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली. रुग्णाने केलेला प्रवास तसेच इतरांशी आलेले संपर्क ही माहिती विचारूनही ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीप्रमाणे उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाच्या कुटुंबातील दुसरा सदस्य आजारी पडल्याने पुन्हा रुग्णालयात आला तर त्याला देखील करोनाची लक्षणे दिसत होती. तपासणी केली तर त्या दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

एकाच कुटुंबातील त्या दोघांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील तोवर कोरोनाची बाधा झालेली होती. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी डॉक्टरचे वय अवघे २६ वर्षे होते . एकाच वर्षांपुवी त्यांचे लग्न झालेले असून त्यांची पत्नी गरोदर आहे. अशा परिस्थितीत तरुण डॉक्टरचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे नगरचे वैद्यकीय विश्व हळहळले आहे.

कोरोना रुग्णांचे होत असलेले हाल आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे ऍडमिट होण्याची वेळ नकोच अशी नागरिकांची मानसिकता आहे . अशा परिस्थितीत तपासणी करत असताना बहुतांश पेशंट आपल्यावर ऍडमिट होण्याची वेळ नको म्हणून खरी माहिती सांगत नाही मात्र त्यामुळे डॉक्टरांची दिशाभूल होते. मात्र यामुळे आज चक्क एका डॉक्टरला आपले प्राण गमवावे लागले आहेत . ‘ताप नाही, सर्दी नाही, आम्ही कोठेच गेलो नाही, आमच्याकडे कोणी पाहुणे आले नाहीत…’ असे अनेक जण बिनधास्त खोटे सांगताना दिसत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.


शेअर करा